यावर्षी उशिरापर्यंत (खरीप 19) पावसामुळे काजू झाडांना उशिरा मोहर (फुलोरा) आला. त्यानंतर ही सततच्य बदलत्या हवामानामुळे आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे जेमतेम 30 टक्के इतके उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले.
ऐन हंगामात covid-19 च्या महामारी मुळे काजूबी काढण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले, त्यामुळे ही हाती आलेल्या उत्पादनाचे नुकसान झाले. चालू वर्षी एकूण सर्वत्र काजू उत्पादन सरासरीपेक्षा कमी असून या विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटामुळे काजू खरेदी प्रक्रिया तसेच निर्यातीवर मर्यादा आलेल्या आहेत. त्यातच लॉकडाउन मुळे, लग्नसमारंभ, सणवार, हॉटेल – बार व्यवसाय इ. पूर्णपणे बंद असून कोकणातील काजूला जास्त मागणी असणारे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी सारखे देश आणि भारतातील इतर राज्ये कोरोना रोगाबरोबर निकराचा लढा देत आहेत. त्यामुळे कोकणातील काजू उत्पादक शेतकरी निराशेत जाऊ लागले आहेत.
याचा फायदा घेऊन काजू गराची मागणी व निर्यात कमी झाल्याचे कारण ठेवून बाजारात काजूबी खरेदीचा दर कमी करण्यात आलेला आहे. दरवर्षी मिळणाऱ्या प्रति किलो रुपये 150 ऐवजी आता फक्त रु. 70 ते 80 रुपये प्रती किलो भाव मिळत आहे.
पिक संरक्षणावरील वाढता खर्च लक्षात घेता हा दर काजू बागायतदारांचे नुकसान करणारा आहे. तरी यासाठी महाराष्ट्र शासनाने खालील मुद्द्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेतल्यास कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.
1) कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांकडून काजू खरेदी करणारे व्यापारी आणि काजू प्रक्रिया व्यावसायिकांनी रुपये 140 रुपये 150 प्रति किलोप्रमाणे काजू खरेदी करण्याबाबत आवाहन करणे.
2) महाराष्ट्र शासनाने कापूस व तूर खरेदी केंद्राप्रमाणे कोकणात काजू खरेदी केंद्र त्वरित सुरू करून शेतकऱ्यांना रुपये 140 ते 150 इतका हमीभाव द्यावा.
3)परदेशातून आयात होणाऱ्या काजूचा दर्जा हा कोकणातील काजू पेक्षा नेहमीच निकृष्ट असतो. आणि त्यावर फक्त पाच टक्के आयात शुल्क आकारले जाते. त्यामुळे तो काजू कमी दरात उपलब्ध होतो. व परिणामी कोकणातील काजू मालाच्या विक्रीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. सबब काजूवरील आयात शुल्क 5% वरुन 10% इतका करण्यात यावा.
या बरोबर कोकण काजू ला भौगोलिक सांकेतांक (GI) संरक्षण मिळावे, जेणेकरून परदेशी काजूच्या तुलनेत उत्कृष्ट चवीच्या गुणवत्तापूर्वक कोकण काजूला जादा दर मिळावा असे निवेदन स्नेहसिंधु अॅग्रीकल्चर ग्रॅज्युएट असोसिएशन सिंधुदुर्ग चेअध्यक्ष हेमंत सावंत यांनी मा.जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना आज दिले आहे. यावेळी संदीप राणे, विजय सावंत,पंकज दळी उपस्थित होते.