सिंधुदुर्ग – कणकवली रेल्वे स्थानकात आज तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कोकण रेल्वे एम्प्लॉइज युनियनचे बॅनर फाडण्यात आल्याने हा तणाव निर्माण झाला होता.
कणकवली रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रवाशांच्या स्वागताच्या बॅनर वरील कॉ. वेणू पी. नायर यांच्या फोटोलाहि चिखल फासत विटंबना करण्यात आली. त्यामुळे कणकवली रेल्वे स्थानकात दोन संघटनांच्या वादातून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
कणकवली रेल्वे स्टेशनवरील एनआरएमयू चे काही बॅनर फाडलेल्या स्थितीत आढळून आले. तर रेल्वे स्टेशनबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवरील वेणू नायर यांच्या प्रतिमेचं विद्रुपीकरण करण्यात आले होते.
विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी रेल कामगार सेनेनं रेल्वे स्टेशनवर ढोलपथकही आणलं होते. परंतु वातावरण तणावपूर्ण स्थितीत गेल्याची खबर मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक रेल्वे स्टेशनवर दाखल झाले.
आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या रेल कामगार सेनेच्या काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेत या कर्मचाऱ्यांवर भादवि कलम ६८, ६९ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
दरम्यान एनआरएमयूच्या कणकवली येथील कार्यालयाबाहेर देखिल रेल कामगार सेनेचे झेंडे लावल्याच आढळून आले आहे. या साऱ्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.