सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह कणकवली तालुक्यातील ५ महसूल कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
महसूल दिनी १ ऑगस्ट रोजी या अधिकारी-कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्या पुरस्कारांचे वितरण आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार कार्यालयातील सेवानिवृत्त अव्वल कारकून शिवाजी परब, उर्फ परब भाऊसाहेब, प्रांताधिकारी कार्यालयातील वाहन चालक अरुण जोगळे, फोंडाघाट तलाठी अर्जुन पंडित, ओसरगाव कोतवाल अरविंद राणे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकार्यांच्या हस्ते आज या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. २०२०-२१ या कालावधीत महसूल विभागात उत्कृष्ट सेवा बजावत समाजाभिमुख काम केल्याबद्दल दरवर्षी अशाप्रकारचे पुरस्कार दिले जातात.
या पुरस्काराबद्दल प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या पुरस्कार वितरणप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.