कणकवली – नगरपंचायत कणकवली आणि युथ वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजार मध्ये सहभागी झालेल्या कुंभार बांधव आणि बचत गटांच्या स्टॉलची आठवड्याभरात 9 लाख 80 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रतिदिन सरासरी 1 लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. कुंभार बांधवांनी आपल्याकडे कायमस्वरूपी जागेची मागणी केली आहे, त्याबाबत नगरपंचायत सकारात्मक विचार करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
नगराध्यक्ष दालनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते याप्रसंगी आरोग्य सभापती संजय कामतेकर, नगरसेवक अभी मुसळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, विवेक ताम्हणकर, युथ वेलफेअर असोसिएशनचे सचिव रुपेश घाडी अनिकेत घाडीगावकर, पंडित परब, संकेत घाडीगावकर, विराज तावडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष समीर नलावडे पुढे म्हणाले, कणकवली तालुक्यातील कुंभार बांधव यांच्या हस्त कौशल्यातून साकारलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री त्याच बरोबर कणकवलीतील बचत गटाच्या महिला भगिनींनी बनवलेल्या दिवाळी फराळाचे स्टॉल दिवाळी बाजारामध्ये लावण्यात आले होते. 28 ऑक्टोबरला हा बाजार सुरू झाला आज 3 नोव्हेंबरला हा बाजार संपत असताना न भूतो न भविष्यति असा प्रतिसाद कणकवलीकरांनी तालुक्यातील नागरिकांनी दिला आहे. विशेष म्हणजे केवळ आठवडा बाजारात विक्रीची संधी उपलब्ध असलेल्या कुंभार बांधवांना या ठिकाणी आपल्या मालाची विक्री करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली. येथे आलेल्या अनुभवानंतर कुंभार बांधवांनी नगरपंचायतकडे कायमस्वरूपी जागेची मागणी केली आहे. याबाबत कुंभार समाज बांधवांचे जिल्हाध्यक्ष आणि संघटना पदाधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही नगराध्यक्ष म्हणाले.
या बाजारात एकूण 37 स्टॉल लावण्यात आले होते. यापैकी 15 स्टॉल हे कुंभार बांधवांचे होते. या सर्वांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि नगरपंचायत व युठ वेल्फेअर असोसिएशन यांचा उद्देश सफल झाला आहे. आगामी काळात देखील अशाच पद्धतीचे उपक्रम कणकवली नगरपंचायत आणि युती वेल्फेअर असोसिएशन च्या माध्यमातून कणकवली मध्ये आम्ही राबवणार आहोत. जिल्ह्यातील या पहिल्याच उपक्रमाला चांगला प्रतिसाद कणकवलीकरांनी आणि तालुक्यातील जनतेचे दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानत आहे, असेही नगराध्यक्ष यावेळी म्हणाले.