सिंधुदुर्ग – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेले निर्बंध अद्याप उठवले नसले तरी आंबोलीतील पर्यटन स्थळाकडे पर्यटकांची पावले वळताना दिसत आहेत. एकीकडे त्यांना रोखण्यासाठी आंबोली पोलिस कारवाईचा बडगा उगारत आहे. परंतु दुसरीकडे बरेचसे पर्यटक कुटुंबासमवेत असल्याने त्यांना रोखायचे कसे?, असा प्रश्न पोलिसांसमोर आहे. कोरोना रुग्णांची संख्या अद्यापपर्यंत कमी झालेली नसल्यामुळे राज्यातले निर्बंध अद्याप उठवण्यात आलेली नाही. तर पर्यटन स्थळेसुद्धा सुरू करण्यात आलेले नाही. परंतु गेले अनेक महिने कंटाळले पर्यटक आंबोलीत गर्दी करताना दिसत आहेत. आपण त्या रस्त्यावरून प्रवास करीत आहोत,असे सांगून ते पर्यटक आंबोली धबधबा तसेच अन्य ठिकाणी थांबताना दिसत आहेत. कुटुंबासमवेत असल्याने पोलिसांना सुद्धा कारवाई करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा लक्षात घेता, काही अंशी शिथिल करून पर्यटन स्थळे सुरू करण्यात यावीत,अशी मागणी आंबोली ग्रामस्थ तसेच पर्यटकांतून होताना दिसत आहेत.