राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेली राजकीय उलथापालथ थांबण्याची चिन्हे नाहीत. भाजप मधील काही महत्त्वाचे नेते नाराज असल्याचे चित्र आहे. यामध्ये एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. एकनाथ खडसेंचा आम्ही सर्व आदर करतो. त्यांनी भविष्यात काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला तर आम्ही निश्चित त्यांचे स्वागतच करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधला. पंकजा मुंडे आणि रोहीणी खडसेंच्या पराभवामध्ये भाजपच्या लोकांचा हात आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसेंनी केले होते. त्याविषयी बोलताना थोरात म्हणाले, भाजपच्या राजकारणाची पद्धत लेकशाहीला अनुरुप नाही. ओबीसी समाजातील जे नेते मोठे होत आहेत त्यांना जाणीवपुर्वक कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते आहे. खडसे नाराज आहेत ही गोष्ट सर्वांना माहित आहे. मात्र, त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही. त्यांनी विरोधीपक्ष नेता म्हणून चांगले काम केले आहे. त्यांनी आमच्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांचे निश्चीतच स्वागत करू, असे थोरात म्हणाले.