उद्धव ठाकरेंच्या निष्ठावान शिलेदाराच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी युती मैदानात
इतर ठिकाणचे निकष बदलत मुख्यमंत्र्यांचा सिंधुदुर्गात कार्यक्रम, राजकीय घडामोडींना वेग
नारायण राणेंकडून ठाकरे गटाचा बालेकिल्ला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू
सिंधुदुर्ग – शासन आपल्या दारी या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी तालुक्यात करण्याचे नियोजन होते. राज्यात मुख्यमंत्री शिंदेंबरोबर ठाकरे गटाचे गेलेले आमदार ज्या – ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी ह्या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जेणेकरून शिंदे बरोबर गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना ताकद देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली होती. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मतदारसंघातील आमदार व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील हा नियोजित कार्यक्रम कुडाळ मध्ये घेण्यात येत असल्याने ठाकरे गटाचे आमदार वैभव नाही यांना धोबीपछाड देण्यासाठी ही जागा बदलण्यात आल्याचे समजते.
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटचे संबंध असल्याने राज्यातील या अभियानाच्या शुभारंभाचा निकष बहुदा सिंधुदुर्ग जिल्हा पुरता बाजूला ठेवण्यात आला. अशी चर्चा आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यात देखील पालकमंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अन्य ठिकाणीच हा निकष लावण्यात आला. परंतु येत्या काळात विधानसभा निवडणुकीसाठी कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे हे आमदारकीसाठी इच्छुक आहेत व आमदार वैभव नाईक यांच्यासमोर एक आव्हान निर्माण करण्याच्या दृष्टीने राणेंनी आतापासूनच या अभियानाच्या शुभारंभ निमित्त मुख्यमंत्र्यांना कुडाळ मध्ये आणत कंबर कसल्याची चर्चा या अभियानाच्या निमित्ताने होऊ लागली आहे.
दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली हे सावंतवाडी मतदारसंघात आमदारकीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेचे आमदार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील शासन आपल्या दारी या नियोजित जिल्हास्तरीय अभियानाच्या शुभारंभाचा कार्यक्रम राणेंनी आपले राजकीय वजन वापरून आमदार वैभव नाईक यांना शह देण्याकरिता कुडाळमध्ये घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळा सुरू आहे. मात्र यातून दीपक केसरकर यांची या बदललेल्या जागे करिता सहमती आहे का? असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहत अखेर पर्यंत ठाकरे सोबत अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील त्यांनी काही वेळा टीका केली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर कुडाळ मधील ठाकरे गटाचा गड भाजपने आपल्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे चित्र या अभियानाच्या निमित्ताने दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात वैभव नाईक यांना शिवसेना शिंदे गट व भाजपा एकत्र येऊन रोखण्याच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करत असून यात वैभव नाईक यांची एसीबी कारवाई पाठोपाठ आता या माध्यमातून कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.
या कोंडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा होत असलेला दौरा हा महत्त्वपूर्ण असून निलेश राणेंच्या कुडाळ मतदार संघातील दावेदारीच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच या घडामोडीनंतर आमदार वैभव नाईक हे काय भूमिका घेणार ते देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. परंतु एकंदरीत शिवसेना शिंदे गटाकडून आमदार वैभव नाईक यांचा मतदारसंघ पोखरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून, राणेंच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या या बालेकिल्लाला सुरुंग लावण्याचा हालचालींनी वेग घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात घडणाऱ्या घडामोडींकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.