आमदार विरेश बोरकर यांचा शिरोडा मतदारसंघात दौरा. जाणून घेतल्या जनतेच्या समस्या

0
404

 

रेव्होलुशनरी गोवन्स च्या पदाधिकाऱ्यांनी आता राज्यभर अनेक मतदारसंघात जनतेचे विषय जाणून घेण्यासाठी दौरे सुरू केले आहे. गावागावात उद्भवणाऱ्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि त्यामुळे होणारे लोकांचे हाल, त्याचबरोबर जनतेचे गंभीर आणि ज्वलंत विषय समजून घेण्यासाठी आणि ते विषय सरकारच्या नजरेसमोर आणून देण्यासाठी ह्या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

काल शुक्रवारी सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी स्वतः शिरोडा मतदारसंघाचा दौरा केला. सुरुवात करताना त्यांनी श्री कामाक्षी देवीचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर शिरोडा बाजारातील व्यापारी तसेच छोटे मोठे उद्योगधंदे, व्यवसाय करणाऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. लोकांनी मुक्तपणे त्यांच्याकडे आपआपल्या समस्या मांडल्या. इतकी वर्षे शिरोडा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत कसा मागे राहिला त्याची गाथा सुद्धा जनतेने ह्यावेळी बोरकर यांना बोलून दाखविली.

विरेश बोरकर यांनी पंचवाडी इथल्या म्हैसाळ धरणाला सुद्धा भेट दिली. ह्यावेळी अधिकारी वर्गाशी पाणीपुरवठा करताना उद्भवणाऱ्या समस्यांविषयी जाणून घेतले असता, हा प्रकल्प १०एमएलडी चा असून २०१८ मध्ये ह्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. परंतु अजूनपर्यंत सरकारच्या बेजबाबदारपणामुळे, अकारुक्षमतेमुळे सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचेही दिसून आले. हा प्रकल्प चालविण्यासाठी खासगी कंपनीला दिलेला असून आता त्यांचे कंत्राट सुद्धा संपलेले आहे. असे असताना सरकार परत त्यांनाच हा प्रकल्प टेंडर शिवाय चालविण्यासाठी देत आहे. आज सरकारने खरं तर स्वतः हा प्रकल्प आपल्या हातात घ्यायला हवा होता. वेळोवेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि ह्याचा फटका सामान्य जनतेला बसत असून सरकारने याविषयाकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही बोरकर म्हणाले .

शिरोडा मतदारसंघात आजही काराय, तरवळे, वजनगाळ, वाजे बिबळ, आंबेगाळ सारख्या गावांना सरकारला पाणीपुरवठा करता आले नाही. म्हैसाळ धरण जवळ असून सुद्धा नजीकच्या गावांना पाणी पुरवठा होत नाही. राज्य सरकारकडून १००%हर घर जल योजना सफल झाल्याची खोटी पब्लिसिटी सुरू असून वास्तवात शिरोडा मतदारसंघात जो स्वतः जलस्त्रोत मंत्र्यांचा मतदारसंघ आहे तेथील गावागावात लोकांची पाण्यासाठी वणवण सुरू असून अक्षरशः लोक हताश झालेले आहेत. राज्यातील डबल इंजिन सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यास पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचेही विरेश बोरकर म्हणाले

या दौऱ्या दरम्यान त्यांनी बोरी गावातील महामार्ग विस्तारीकरणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेवून त्यांचा विषय जाणून घेतला आणि त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासनही बोरकर यांनी दिले. शेवटी बोरकर यांनी बेथोडा ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. एकंदरीत त्यांनी शिरोडा मतदारसंघातील जनतेचे गंभीर आणि ज्वलंत विविध विषय जाणून घेतले असता त्यांना सर्वोपरी पाठिंबा देण्याचे वचनही ह्यावेळी बोरकर यांनी जनतेला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here