अजितदादांच्या विमानाचा भीषण स्फोट कशामुळे ? रोहित पवारांचे गंभीर आरोप आणि ब्लॅक बॉक्सबाबत मोठा दावा

0
2

​मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या प्रकरणावर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अत्यंत खळबळजनक माहिती समोर आणली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, त्यांनी घेतलेल्या आधीच्या पत्रकार परिषदेनंतरच तपासाला खरी गती मिळाली आहे आणि आता इतर नेतेही यावर पत्रव्यवहार करू लागले आहेत. अजित पवार यांचा हा अपघात होता की घातपात, यावर त्यांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार यांनी अपघाताच्या वेळी झालेल्या स्फोटांचे कारण सांगताना गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, अपघाताचे जे व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामध्ये विमान कोसळल्यानंतर काही कालावधीने मोठे स्फोट होताना दिसत आहेत. या स्फोटांचे मुख्य कारण म्हणजे विमानात क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात इंधन भरण्यात आले होते. हे इंधन केवळ विमानाच्या पंखांमध्येच नाही, तर विमानाच्या आतल्या भागात देखील भरले गेले होते. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ‘ब्लॅक बॉक्स’ असतो, त्या वॉशरूमच्या जवळच हे अतिरिक्त इंधन साठवण्यात आले होते. त्यामुळेच अपघातानंतर आगीचा भडका उडाला आणि ब्लॅक बॉक्स जळाल्याचे कारण आता पुढे केले जात आहे, असे रोहित पवार म्हणाले. ब्लॅक बॉक्स जळाल्याचे सांगणे हे केवळ तपासात दिशाभूल करण्यासाठी सुरू असल्याचे त्यांनी सूचित केले.

विमान चालवणाऱ्या वैमानिकांच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती देताना रोहित पवारांनी धक्कादायक खुलासे केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य वैमानिक सुमित कपूर यांना दारूचे प्रचंड व्यसन होते आणि याच कारणामुळे ते यापूर्वी तीन ते चार वर्षांसाठी निलंबित देखील झाले होते. कमी पगारावर ते काम करत होते. तसेच, रोहित सिंग नावाच्या दुसऱ्या पायलचा परवाना देखील दारूच्या सेवनामुळे दोन वेळा रद्द करण्यात आला होता. याशिवाय, कॅप्टन कार्लोस हा मूळचा व्हेनेझुएलाचा असून तो भारतात केवळ प्रवासी (टुरिस्ट) म्हणून आला होता. असे असतानाही त्याला विमान चालवण्याची परवानगी नसताना तो विमान चालवत होता, असा गंभीर दावा रोहित पवारांनी केला आहे.

तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकताना रोहित पवार म्हणाले की, नियमानुसार कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) मध्ये किमान दोन तासांचे संभाषण रेकॉर्ड होणे अपेक्षित असते, परंतु या विमानात केवळ ३० मिनिटांचे रेकॉर्डिंग उपलब्ध होते. तसेच, या विमानाची उड्डाण क्षमता (Flying Hours) ५००० तासांची असताना, ते ८००० तासांपेक्षा जास्त वापरले गेले होते. विमानाची खरेदी आधी झाली आणि नोंदणी नंतर करण्यात आली, अशा अनेक संशयास्पद बाबी त्यांनी मांडल्या. जर सत्तेबाहेरील व्यक्ती एवढी सखोल माहिती मिळवू शकते, तर सत्तेत बसलेल्यांना हे सत्य का शोधता येत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, विमान अपघात तपास ब्युरोने यावर अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यांच्या मते, विमानात लागलेल्या भीषण आगीमुळे दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान झाले आहे. तथापि, त्यातील एका रेकॉर्डरमधून काही संभाषण डेटा मिळवण्यात यश आले आहे. कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरच्या सखोल विश्लेषणासाठी संबंधित उत्पादक कंपनीची मदत घेतली जात आहे आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हा तपास सुरू असल्याचे ब्युरोने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here