सिंधुदुर्ग : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने नाटळ येथील मल्हार नदीवरील पूल कोसळला होता. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांची संपर्क व्यवस्था कोलमडली होती. या पुलाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने उपाययोजना करून गणेश चतुर्थीपूर्वी याठिकाणी पूल उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीने या पूलाच्या कामासाठी निधी मंजूर करून दिला. गणेश चतुर्थीआधी युद्धपातळीवर काम करून हा साकव पूल बांधण्यात आल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेला शब्द सत्यात उतरला आहे. आज गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी या पुलाचे लोकार्पण खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
नाटळ येथील मल्हार पूल कोसळल्याने आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. ही गैरसोय दूर करून पर्यायी पूलाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत, खास. विनायक राऊत तसेच आम. वैभव नाईक यांनी येथील ग्रामस्थांना दिले होते. त्यादृष्टीने गणेश चतुर्थीआधी हा साकव पूल ग्रामस्थांच्या सेवेसाठी खुला करण्याच्या दृष्टीने तातडीने हालचाली करण्यात आल्या. पालकमंत्री उदय सामंत यांनी या पुलाच्या कामाकरीता तातडीने निधी मंजूर केला होता.
त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मल्हार नदीवरील नवीन पूल वाहतुकीस सुरू झाला. त्याचे लोकार्पण खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक व शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मल्हार नदीवरील या नवीन पर्यायी पुलाचे लोकार्पण झाल्याने गेले काही महिने बंद असलेला रहदारीचा मार्ग ग्रामस्थांसाठी अखेर सुरू झाला आहे.
या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, शिवसेना विधानसभा संघटक सचिन सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, रीमेश चव्हाण, ऍड. हर्षद गावडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व नाटळ कनेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील उपस्थित होते. अल्पावधीत या पुलाचे काम पूर्ण केल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांनी समाधान व्यक्त करत जनतेसाठी शिवसेना सदैव तत्पर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे सांगितले.