सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणला झटका, 1 लाख 13 ग्राहकांकडून 71 कोटींची थकबाकी कोरोनामुळे ग्राहकांकडून रक्कम थकीत

0
84

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील 1 लाख 13 हजार 23 वीज ग्राहकांकडे आतापर्यंत वीजबिलापोटी तब्बल 71.30 कोटी रुपये एवढी प्रचंड थकबाकी आहे. मार्च 2020 मध्ये हीच थकबाकी 24 कोटी रुपये होती. मात्र, कोरोना कालावधीत ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. 93 हजार 840 घरगुती वीज ग्राहकांकडे 29 कोटी 59 लाख 97 हजार रुपये एवढी मोठी थकबाकी आहे.

केव्हाही होऊ शकतो वीजपुरवठा खंडित

दरम्यान, उच्चदाब ग्राहक व 20 केव्ही जास्त लोड असलेल्या ग्राहकांना वीज वितरणने बिले भरण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून केव्हाही येऊ शकतात, असे वीज वितरणचे सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी सांगितले. ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, उच्चदाब वीज ग्राहकांना बिले भरण्याबाबत नोटिसा पाठविल्या आहेत. घरगुती ग्राहकांना वीजबिल भरण्याबाबत त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आवाहन केले आहे.

घरगुती ग्राहकांकडे मोठी थकबाकी

कणकवली विभागातील 47 हजार 774 घरगुती ग्राहकांकडे 14 कोटी 3 लाख 8 हजार रुपये, तर कुडाळ विभागात 46 हजार 66 ग्राहकांकडे 15 कोटी 56 लाख 89 हजार रुपये एवढी मोठी थकबाकी आहे. घरगुती ग्राहक कोरोना काळात वीजबिल थकल्याने व आता ती रक्कम मोठय़ा प्रमाणात वाढल्याने ते एकदम ती भरू शकत नाहीत. अशातच वीजबिल माफी मिळेल म्हणून काही ग्राहक वीजबिल भरत नाहीत. त्यामुळे वर्षभरात तिप्पट थकबाकी वाढली आहे.

वाणिज्य ग्राहकांकडे पावणे तेरा कोटींची थकबाकी

कणकवली विभागातील 4843 वाणिज्य ग्राहकांकडे 6 कोटी 58 लाख 15 हजार, तर कुडाळ विभागात 5039 ग्राहकांकडे 6 कोटी 28 लाख 99 हजार मिळून 10 हजार 782 ग्राहकांकडे 12 कोटी 87 लाख 14 हजार रुपये एवढी थकबाकी आहे.

औद्योगिक ग्राहकांची 10 कोटींची थकबाकी

कणकवली विभागात 967 औद्योगिक ग्राहकांकडे 5 कोटी 69 लाख 97 हजार, तर कुडाळ विभागात 1193 ग्राहकांकडे 4 कोटी 38 लाख 57 हजार रुपये मिळून 2160 ग्राहकांकडे 10 कोटी 8 लाख 54 हजार रुपये थकबाकी आहे.

पथदीपांपोटी सव्वा बारा कोटीची थकबाकी

पथदीपांपोटी जिल्हय़ातील 2354 ग्राहकांकडे 12 कोटी 39 लाख 91 हजार रुपये थकबाकी आहे. यात ग्रामपंचायती, नगरपालिका, शासनाचे विविध उपक्रम यांचा सहभाग आहे. कणकवली विभागातील 1230 पथदीप ग्राहकांकडे 6 कोटी 14 लाख 11 हजार, तर कुडाळ विभागात 1115 ग्राहकांकडे 6 कोटी 25 लाख 80 हजार रुपये एवढी थकबाकी आहे.

पाणी योजनेंतर्गत कोटीची थकबाकी

सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळयोजनेकडे 4 कोटी 18 लाख रुपये थकबाकी असून 1357 ग्राहकांकडून येणे रक्कम आहे. कणकवली विभागातील 827 ग्राहकांकडून 2 कोटी 90 लाख 70 हजार रुपये, तर कुडाळ विभागात 530 ग्राहकांकडून 1 कोटी 27 लाख 37 हजार रुपये वीजबिलापोटी थकबाकी आहे.

शासकीय कार्यालयांकडेही थकबाकी

शासकीय कार्यालये, सार्वजनिक संस्थांकडे वीजबिलापोटी 1 कोटी 36 लाख 84 हजार रुपये थकबाकी आहे. कणकवली विभागातील 1077 ग्राहकांकडे 66 लाख 67 हजार, तर कुडाळ विभागात 1088 ग्राहकांकडे 70 लाख 17 हजार थकबाकी आहे. इतर 365 ग्राहकांकडे 79 लाख 46 हजार थकबाकी आहे.

कोरोना काळात वाढली थकबाकी

कोरोना काळात नोकरी, व्यवसाय, कामधंदाही ठप्प झाला. तसेच वीज वितरणची दरमहा वीजबिले निघाली नाहीत. त्यामुळे या काळात थकबाकी वाढली, ती वाढतच गेली. एकदा थकबाकी राहिली, ती भरणे शक्य झाले नाही. मग ती दरमहा वाढतच गेली. त्यामुळे आता मार्च 2020 च्या तुलनेत तिप्पट थकबाकी वाढली आहे. थकबाकी वाढत गेल्याने वीज वितरणला पगार व अंतर्गत कामावर खर्च करण्यात मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन वीज कंपनीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here