सिंधुदुर्गच्या राजकारणात “किरण” सामंत यांचा “उदय”? कणकवलीतील बॅनरची जिल्ह्यात चर्चा

0
54

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा माहोल सुरू झालेला असतानाच राजकीय पक्षांकडून देखील नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जाते. कणकवली शहरात देखील शिवसेनेकडून गेली काही वर्षे नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते.

या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहरात श्रीधर नाईक चौकात नवरात्रोत्सव शुभेच्छां संदर्भात एक लावलेला बॅनर सध्या कणकवली सह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे बंधू सुप्रसिद्ध उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांचा बॅनर कणकवली श्रीधर नाईक चौकात ठळकपणे झळकल्याने सध्या हा बॅनर राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय बनला आहे.

घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देणारा हा बॅनर व त्यावर किरण उर्फ भैया सामंत यांचा मोठा ठळक दिसेल असा फोटो हा येत्या काळात “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन राजकीय बदलांचा “उदय” तर नव्हे ना?” असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

काही महिन्यांपूर्वीच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी किरण सामंत हे कोकणचे दुसरे सचिन वाझे असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. तर शिवसेने अंतर्गत पन अंतर्गत न राहिलेल्या काही घडामोडींमध्ये ही अनेकदा किरण सामंत यांचे नाव गेल्या काही महिन्यांमध्ये प्रामुख्याने चर्चेत येऊ लागले आहे.

शिवसेनेच्या पक्षांतर्गत झालेल्या बैठकांमध्ये ही किरण सामंत यांचा हस्तक्षेप असतो असे बोलले जाते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विकास कामे वाटपामध्ये ही शिवसेनेच्या गोटात किरण सामंत हे नाव घेतले जाते.

सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत व किरण सामंत हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असले तरी, व्यवसायानिमित्त रत्नागिरी येथे स्थायिक झाल्यानंतर सामंत बंधूनी राजकारण व व्यवसायातही जम बसवला. मात्र जिल्ह्याचे सुपुत्र उदय सामंत यांच्यावर शिवसेनेने विश्वास टाकला व त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली.

या साऱ्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी सुरू असलेल्या चर्चा, केव्हा नव्हे ते थेट त्यांच्यावर आमदार नितेश राणेंनी केलेले आरोप व त्यानंतर कणकवली किरण उर्फ भैय्या सामंत यांचा लागलेला हा बॅनर सध्या लक्षवेधी ठरत आहे. हा बॅनर म्हणजे येत्या काळातील सिंधुदुर्गाच्या राजकारणातील किरण उर्फ भैय्या सामंत यांचा “उदय” तर नव्हे ना? अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या फळीतील नेते, लोकप्रतिनिधी व काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे.

रेल्वे स्टेशन कडून येताना स्पष्ट दिसेल असा ठळक लावलेला हा बॅनर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नवीन राजकीय समीकरणाची नांदी ठरणार का? के पहाणे आता महत्वाचे असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here