सिंधुदुर्गचे शिक्षणमंत्री असताना देखील जिल्ह्याला शून्य शिक्षकी शाळांचा ठपका बसला हे दुदैव – खा. विनायक राऊत

0
75

 

१२१ शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विदयार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होणार आहे. आपल्याच जिल्ह्याचे शिक्षण मंत्री असताना देखील शून्य शिक्षकी शाळा म्हणून आपल्या जिल्हयाला ठपका बसला हे दुदैव आहे. शून्य शिक्षकी १२१ शाळा आणि जिल्ह्यात ११४० शिक्षकांची कमतरता हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ओढवलेले शासन पुरस्कृत संकट आहे ते दूर करण्यासाठी १५ जून रोजी जिल्हाभर आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांना जाग यावी यासाठी १६ जून रोजी सावंतवाडीत आदोलन छेडणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

जिल्ह्यातील १२१ शाळांच्या शिक्षक प्रश्नाबाबत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. उपाययोजनांबद्दल माहिती घेतली. अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी नवीन शिक्षक भरती होईपर्यंत स्थानिक डीएड, बीएड बेरोजगार उमेदवारांना जि. प. स्वनिधीतून मानधन तत्वावर नियुक्त करण्याची मागणी केली. मात्र शिक्षक उपलब्ध न केल्यास १५ जून रोजी प्रत्येक शिक्षणाधिकऱ्यांच्या कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा पुन्हा एकदा इशारा खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांनी दिला. त्यावर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या १० टक्के पेक्षा कमी होत नाही तोपर्यत शिक्षक बदली करायची नाही असा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत घेण्यात आला होता. मात्र आता जिल्ह्यात शिक्षकांची ३० टक्के पदे रिक्त असताना देखील शिंदे फडणवीस सरकारने १० टक्क्यांची अट रद्द करून शिक्षक बदलीचा जाचक शासन निर्णय काढला. त्याआधारे या शिक्षकांना सोडण्यात आले. आपल्या जिल्हयातील विद्यार्थ्यांची आपुलकी असती तर शिक्षण विभागाने हा शासन निर्णय काढला नसता असे ते म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत,कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, बाबा आंगणे, नितीन घाडी,बाबू टेंबुलकर, निसार शेख आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, व शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here