सिंधुदुर्ग – संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्जन्यमान मोजणे आणि नैसर्गिक पाण्याची माहिती गोळा करण्याचे काम करणारे कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील जलविज्ञान प्रकल्पाच्या मुख्य कार्यलयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मागील १० वर्षापासून कार्यलयातील गरजांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे मुख्य कार्यलयाची इमारत हि मोडकळीला आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या उप विभागांतर्गत येणाऱ्या ११ सरिता जलमापन केंद्र आणि ९ हवामान केंद्रांवरील मोजमाप उपकरणे ३० वर्षांपूर्वीची जुनी आहेत. यापैकी बहुतांवशी उपकरणे नादुरुस्त असून हवामानाच्या रिडींगबाबत शंका व्यक्त होत आहे.
मागील ३ वर्षात येथील जबाबदार कार्यकारी अभियंता यांनी एकदाही या कार्यालयास भेट दिली नसल्याने फोंडाघाट येथील जलविज्ञान प्रकल्पाचे जिल्ह्याचे हे मुख्य कार्यलय आणि येथील कारभार अखेरच्या घटका मोजत आहे. जलविज्ञान प्रकल्प विभाग,कळवा-ठाणे या विभागामार्फत संपूर्ण कोकण प्रदेशातील पर्जन्यमान आणि नैसर्गिक पाण्याबाबत माहिती गोळा करणेचे काम चालते. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचे मुख्य कार्यालय जलविज्ञान प्रकल्प उपविभाग फोंडाघाट येथे असून या कार्यालयाकडे आणि येथील कारभाराकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
या उपविभागीय कार्यालयांतर्गत ५ शाखा असून प्रत्येक शाखेचा प्रमुख हा सेक्शनल इंजिनियर असतो व त्यास ४ सहाय्यक कर्मचारी दिलेले असतात मात्र आजच्या तारखेला या पाच शाखांचा प्रमुख आणि त्यांचे चार सहाय्यक कर्मचारी अशा ९ कर्मचाऱ्यांचा कारभार फोंडाघाट कार्यलयातील एकच अभियंता या सर्वांचे काम सांभाळत आहेत. फोंडाघाट जलविज्ञान प्रकल्प उपविभाग कार्यालयाचे प्रमुख हे उपअभियंता असतात. मात्र येथील हे पद मागील दोन वर्षापासून रिक्त असून रायगड जिल्ह्याचे आणि रत्नागिरी जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या उपभियंत्याजवळच फोंडाघाट उपविभागाचा अतिरिक्त कारभार सोपवलेला आहे. मागील १५ महिन्यात एकदाही हे उपअभियंता अधिकारी फोंडाघाट कार्यालयाकडे फिरकलेले नसल्याने आपल्या कार्यालयाला कोणी वालीच नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.