रत्नागिरी नगरपरिषद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

0
188

 

विधानसभेसह नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवार विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रवादीचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुदेश मयेकर यांनी ही घोषणा केली आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. या पाच नगरसेवकांपैकी कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, मुसा काझी, मिरकरवाडा येथील सोहेल साखरकर यांना लेखी स्वरूपात राजीनामा देण्याचे आदेश गटनेते सुदेश मयेकर यांनी दिले होते. सोमवारी सायंकाळी हे आदेश चारही नगरसेवकांपर्यंत पोहचवण्यात आले. या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली.बुधवारी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सुदेश मयेकर यांनी मुसा काझी, सोहेल साखरकर, उज्वला शेट्ये, कौसल्या शेट्ये यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, शहराध्यक्ष निलेश भोसले आदी उपस्थित होते. गेल्या दीड वर्षांपासून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान काही नगरसेवकांनी शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांना मदत केल्याचाही ठपका त्यांच्यावर आहे. तर काही नगरसेवक उघड उघड शिवसेनेचा प्रचार करत होते, असे सागंण्यात आले आहे.

जिल्हाध्यक्षांना माझी कारवाई चुकीची वाटत असेल तर त्यांनी थेट माझ्यावर कारवाई करावी. मात्र, असे दगाबाज नगरसेवक पक्षात नको, असा थेट हल्ला मयेकर यांनी यावेळी चढवला. पक्षविरोधी काम करणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण झाली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांकडूनच अशी मागणी होत होती. पक्ष विरोधात काम करणाऱ्या नगरसेवकांना ठेवू नका, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सुदेश मयेकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान या चार नगरसेवकांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले जाणार असून चारही नगरसेवकांचा यापुढे पक्षाशी काहीही संबंध नसेल, असे पत्र देणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here