27 C
Panjim
Friday, January 28, 2022

महाराष्ट्रातील सत्तापेच काही सुटेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची आज पुन्हा बैठक

Latest Hub Encounter

राज्यातील सत्तापेच सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचा उल्लेख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. पण, शिवसेनेचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले. शिवसेनेबाबत काँग्रेस नेतृत्वाच्या मनात असलेली अढी दूर झाली का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेशी हातमिळवणी करणार का, या मुद्दय़ावर काँग्रेसने अजून तरी मौन बाळगले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे पर्यायी सरकार लवकरच स्थापन होईल, असा दावा पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, आज (गुरूवार) सकाळी १० वाजता नवी दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. तर उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची संयुक्त बैठक पार पडणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील सत्तापेच सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बुधवारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संयुक्त बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेशी हातमिळवणी, सरकारमधील सहभाग आदी विषयांवर चर्चा झाली. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला अहमद पटेल, वेणुगोपाळ, जयराम रमेश आणि मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे केंद्रीय नेते उपस्थित होते. एकूणच राजधानी दिल्लीत दिवसभर चर्चाचा सपाटा सुरू होता, पण त्यातून निष्पन्न काय झाले हे स्पष्ट झाले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी सहा तासांहून अधिक वेळ बैठक सुरू होती. बैठकीदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. सकारात्मक चर्चा झाली असून, सर्व मुद्दय़ांवर विचार करण्यासाठी गुरुवारीही चर्चा होणार आहे. तसेच, राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यात येईल आणि राज्याला लवकरच स्थिर सरकार मिळेल, असे चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -