भाऊचा धक्‍का ते मांडवा 15 मार्चपासून सुरू होणार रो-रो सेवा

0
271

 

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित भाऊचा धक्‍का ते मांडवा रो-रो (रोल ऑन रोल ऑफ) सेवेला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्‍या 15 मार्च रोजी राज्‍याचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते या रो-रो सेवेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मुंबई महानगराला जोडणाऱ्या समुद्रमार्गावर रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो-रो ही जलवाहतूक सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी 125 कोटी खर्चून मांडवा येथे सुसज्ज टर्मिनल, जेटी आणि ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात आला आहे. तर मुंबईतील भाऊचा धक्का येथेही सुसज्ज टर्मिनल उभारण्यात आले आहे. ही सेवा एप्रिल 2018 मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे ही सेवा रखडली होती.

जवळपास दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर प्रोटोपोरस नामक बोट मागील महिन्‍यात मुंबईतील अरबी समुद्रात दाखल झाली. त्‍यानंतर सर्वप्रकारच्‍या चाचण्‍या पूर्ण होवून ही सेवा आता येत्‍या 15 मार्च रोजी सुरू होत आहे.

एकाचवेळी 50 वाहने आणि 200 प्रवासी घेवून जाण्‍याची या बोटीची क्षमता आहे. यामुळे मुंबईतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांना आपली वाहने घेवून जलमार्गे येता येईल. तसेच यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टळून वेळेची बचत होणार आहे. या निमित्‍ताने कोकणात जलवाहतूकीचे पर्व पुन्‍हा नव्‍याने सुरू होणार असून येथील पर्यटन व्‍यवसायाला चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here