रायगड – जिल्ह्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मुंबई, राज्य, परराज्य आणि परदेशातून 1 लाख 3 हजार 26 नागरिक दाखल झाले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सर्व्हेतून समोर आली आहे. यात अलिबाग, महाड, माणगाव, म्हसळा या तालुक्यात 10 हजारांच्यावर नागरिक दाखल झाले आहेत. त्यामुळे रायगडकरांच्या डोक्याचा ताप वाढू लागला आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली असतानाही एवढे नागरिक आले कसे, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
जिल्ह्यात मुंबई, राज्यातून, परराज्यातुन आणि परदेशातून नागरिकांचा ओघ वाढू लागला आहे. यामध्ये अलिबाग 12 हजार 611, कर्जत 698, खालापूर 1 हजार 472, पेण 2 हजार 821, पनवेल 172, पोलादपूर 7 हजार 477, महाड 12 हजार 424, माणगाव 18 हजार 329, म्हसळा 14 हजार 208, मुरुड 4 हजार 107, सुधागड 8 हजार 37, श्रीवर्धन 6 हजार 553, रोहा 5 हजार 56, तळा 8 हजार 547, उरण 514 असे एकूण 1 लाख 3 हजार 26 नागरिक संचारबंदी काळात जिल्ह्यात दाखल झाले असून सदर माहिती ही जिल्हा परिषदेने संकलित केलेली आहे.
जिल्ह्यात श्रीवर्धन आणि पोलादपूर येथे आलेल्या नागरिकामुळे दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या घटनेनंतर लाखभर आलेल्या इतर नागरिकांमुळे रायगडकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत आता जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून अनेकजण हे क्वारंन्टाइन असून काही जणांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.