29 C
Panjim
Monday, December 5, 2022

कोरोनामुळे कोकणातील मत्स्य निर्यात 40 टक्क्यांनी घटली

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

दर्जेदार आणि चविष्ट मासे म्हटल्यावर कोकणची आठवण नक्कीच होते. सुरमईपासून ते बांगड्यापर्यंत तोंडाला पाणी आणणार्‍या या माशांचा व्यवसाय सध्या अडचणीत आला आहे. याला कारण आहे कोरोना. सध्या कोरोना व्हायरसचा मोठा फटका मासेमारी व्यवसायालाही बसला आहे. कोकणातून ‘रेडी टू इट’ माशांच्या निर्यात होणार्‍या पदार्थांना आता याचा फटका बसला आहे. कोकणातून चीनमध्ये मोठ्या प्रमाणात फ्रोझन माशांची निर्यात होत होती. मात्र, कोरोनामुळे ही निर्यात जवळपास 40 टक्के घटली आहे. त्यामुळे कोकणातील मत्स्य व्यवसायाचे गणित अगदी कोलमडले आहे.

चमचमीत आणि चविष्ट माशांसाठीचे ठिकाण म्हणजे कोकण. पण सध्या याच कोकणातील मत्स्य व्यवसाय अडचणीत आलाय. चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाचा आता जगाने धसका घेतलाय. त्यामुळेच सध्या कोरोना टाळण्यासाठी समुद्री पदार्थ टाळण्याच्या सुचना येत आहेत. कोरोनाच्या विषाणूंचा कोणत्याही मार्गाने संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सध्या सतर्कता बाळगली जाते आहे. त्यासाठी माशांपासून तयार केलेले ‘रेडी टू इट’ या प्रकारातील पदार्थांची मागणी प्रचंड घटली आहे.

कोरोनाच्या भीतीने कोणताही देश माशांची आयात करण्यास तयार होताना दिसत नाही. राणी माशाच्या लगद्यापासून सुरमी तयार केली जाते आणि रत्नागिरीत याचं मोठं मार्केट आहे. या ठिकाणाहून जपान, अमेरिका, इटली आणि युरोप या देशांमध्ये त्याची निर्यात केली जाते. रत्नागिरीतील गद्रे यांचे देखील माशांपासून तयार केलेले रेडी टू इट पदार्थ असेच अनेक देशांमध्ये निर्यात होत होते. एका वर्षात ते जपानमध्ये 20 हजार टन, इटलीमध्ये 6500 टन, अमेरिकेत 5 हजार टन सुरमी निर्यात करायचे. मार्च महिन्यात या मालाची बोलणी होण्याचा कालावधी असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे तब्बल 2 वेळा या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर संदर्भातील बैठका रद्द झाल्या. पुढील काही महिने या बैठका होण्याची शक्यताही धुसर झाली आहे.
अजून संपूर्ण निर्यातीला फटका बसणे बाकी असतानाच या निर्यातदारांना 10 ते 12 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे आणखी 3 महिन्यानंतर कोरोनाचा प्रभाव वाढेल तसा या निर्यातीलाही मोठा फटका बसणार आहे. मार्चपासून पुढील 3 महिने माशांपासून बनवलेले खाद्यपदार्थ कुठल्या देशात किती प्रमाणात लागणार आहेत त्याची बोलणी सुरु होते. मात्र सध्या कोरोना या व्हायरसने डोकं वर काढल्याने खाद्यपदार्थ विकत घेण्याची बोलणी करायला कुठलाच देश पुढे येत नाही. त्यामुळे आत्ताच पहिल्या टप्यात निर्यातीत जवळपास 10 टक्के नुकसान झाल्याचा ढोबळ अंदाज गद्रे मरिन एक्सपोटचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन गद्रे यांनी व्यक्त केला आहे.

एकीकडे माशापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीची अशी अवस्था आहे. दुसरीकडे फ्रोजन माशांच्या निर्यात करणार्‍या व्यवसायिकांची त्यापेक्षा बिकट अवस्था आहे. फ्रोजन केलेला म्हणजे कच्चा मासा सर्वात जास्त चीन या देशात निर्यात केला जातो. जवळपास 50 टक्क्याहून जास्त फ्रोजन मासा चीनला निर्यात होतो. गुजराथ, मुंबई आणि कोचीनच्या बंदरातून हा फ्रोजन मासा चीनला निर्यात केला जातो. मात्र, चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि फ्रोजन मासे निर्यात होणारा सर्व व्यवसाय कोसळला. महाराष्ट्रातून मुंबई बंदरातून वर्षाला 15 हजार टन फ्रोजन मासा चीनला निर्यात होत होता. मात्र चीनमध्ये कोरोनामुळे बंदरच बंद असल्याने फ्रोजन माशांच्या निर्यातीवर 40 टक्क्यांहून अधिक परिणाम झाला.

महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. याच समुद्रातील बांगडा, सुरमई, बळा, म्हाकुळ आणि कोळंबी अशा माशांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात सापडलेला मत्स्य व्यवसाय सध्या कोरोनासारख्या महारोगाच्या विळख्यात सापडलाय. आपल्या जीवाची पर्वा न करता दर्यावर स्वार होणार्‍या या दर्याच्या राजाची आता या संकटातून कधी सुटका होणार याचीच चिंता मच्छिमार क्षेत्रातील अनेकांना लागली आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles