कोकणात कर्फ्युला प्रतिसाद, रत्नागिरीतील विलगिकरण केलेले 6 जण घरी, सिंधुदुर्गात रेडी बंदरातील विदेशी जहाजाला स्थानिकांचा विरोध

0
290

 

कोकणातील तीनही जिल्ह्यात जनता कर्फ्युला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. दिलासादायक चित्र म्हणजे रत्नागिरीतील 17 रूग्णांपैकी 6 जणांना घरी सोडण्यात आले. आता या कक्षांमध्ये केवळ 11 जण शिल्लक राहिले आहेत. तर सिंधुदुर्गतील रेडी बंदरात एक विदेशी जहाज दाखल झाले असून ग्रामस्थांनी ‘कोरोना’च्या भीतीने या जहाजाला विरोध करत रेडी बंदरात थारा देऊ नये, अशी मागणी केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिह्यात विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 17 रूग्णांपैकी 6 जणांना घरी सोडण्यात आले. आता या कक्षांमध्ये केवळ 11 जण शिल्लक राहिले आहेत. यापैकी कोणालाही कोरानाची लक्षणे दिसून आलेली नसून, प्रकृतीही स्थिर आहे. त्यामुळे त्यांच्या थुंकीचा नमुना घेण्यात आलेला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले. विलगीकरण कक्षातील रूग्णांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्रामीण रूग्णालये आणि जिल्हा शासकीय रूग्णालय या ठिकाणी संशयित कोरोनाग्रस्तांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. या कक्षात शुक्रवारपर्यंत 17 जण दाखल होते. या सर्वांवर वैद्यकीय निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी यातील 6 जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता केवळ 11 रूग्ण विलगीकरण कक्षात असल्याचे डॉ. बोल्डे यांनी सांगितले.

दरम्यान रत्नागिरीतील कोरोनाग्रस्ताला 17 मार्च रोजी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचदिवशी रात्री 9 च्या सुमारास या क्यक्तीला शृंगारीतील 10 जण भेटल्याचे समोर येत आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप वॉटस्ऍपवर आल्यावर ‘त्या’ 10जणांचा शनिवारी सकाळपासून शोध सुरू आहे.

सिंधुदुर्गात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 39 जणांना त्यांच्या घरीच निगराणीखाली ठेवण्यात आले असून ते बाहेर पडल्यास पोलीस कारवाई केली जाणार आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि मालवण या चार ठिकाणी आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येत आहेत. जिल्हय़ाच्या सर्व प्रवेशद्वारावर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
रेडी बंदरात एक विदेशी जहाज दाखल झाले असून हे जहाज विदेशी असले तरी ते थेट विदेशातून न येता ते मगदल्ला या भारतीय बंदरातून रेडी बंदरात आले आहे. या जहाजावर मास्टर असलेला अधिकारी हा पोलंडचा नागरिक असून त्या व्यतिरिक्त एकूण 19 कर्मचारी जहाजावर आहेत. मात्र, ते कुठले आहेत, याची माहिती हाती आलेली नाही. मात्र, या पूर्वीच्या भारतीय बंदरात त्यांची वैद्यकीय तपासणी झाली आहे. तसेच रेडी बंदरात दाखल होण्यापूर्वी पाच दिवस मागील वैद्यकीय रिपोर्टही बंदर विभागाला प्राप्त झाला आहे. हे जहाज लायबेरीया या देशातील असून ते 60 हजार मेट्रिक टन क्षमतेचे आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोका नको म्हणून 31 मार्चपर्यंत कोणत्याही जहाजाला रेडी बंदरात थांबा देऊ नये, असे सक्त आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाले तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here