कोकणातल्या 8 समुद्र किनार्‍यांवर उभारला जाणार शॅक्स अर्थात चौपाटी कुटी

0
317

 

सिंधुदुर्ग – गोव्याच्या धर्तीवर कोकणातील चार जिल्ह्यांत 8 समुद्र किनार्‍यांवर शॅक्स (चौपाटी कुटी) योजनेचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली. या ठिकाणी चहा, नाश्ता, भोजन व मर्यादित स्वरूपात बिअरदेखील विकण्याची परवानगी दिली जाणार आहे. कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम न करता स्थानिकांना रोजगाराची संधी यातून निर्माण होईल. 1 सप्टेंबरपासून याची अंमलबजवाणी सुरू होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सामंत म्हणाले, पायलट प्रोजेक्ट रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरे-वारे; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या 8 किनार्‍यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्‍चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल. एका चौपाटीवर कमाल 10 कुटी उभारता येतील. स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल.

निर्माण होणार्‍या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी 80 टक्के जागा राखीव असतील. त्यांचा आकार 15 फूट लांबी आणि 15 फूट रुंद आणि 12 फूट उंच असेल. गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद छत टाकता येईल. कुटी परवान्यासाठी 15 हजार रुपये अर्जाचे नापरतावा मूल्य असेल. या कुटीसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसर्‍या वर्षी 50 हजार, तिसर्‍या वर्षी 55 हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय 30 हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल. तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल. कुटी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वेळेत सुरु ठेवता येईल.संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असेल. यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँका आणि नॅशनल बँकांशी चर्चा सुरू आहेत. विक्री होणार्‍या पदार्थांचे दरफलक लांबून दिसतील अशा पद्धतीने लावायचे आहेत. येथे वापरण्यात येणार्‍या जेवणाची ताटे पर्यावरणपूरक असावीत. यासाठी केळी, सुपारी यांचा पानाचा वापर केला जाणार आहे.कोकण विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी आपण व पालकमंत्री परब प्रयत्नशील आहोत ,असेही सामंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here