सिंधुदुर्ग – मिरॉन नावाचा केवळ अकरा वर्षाचा रशियन मुलगा आई-वडिलांबरोबर भारत फिरण्यासाठी आला .परंतु सध्या भ्रमंतीऐवजी सिंधुदुर्ग मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रमला आहे .
सिंधुदुर्ग मधल्या आजगाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सध्या गावातील मुलांबरोबरच एक परदेशी चिमुकला अध्ययन करतोय . मिरॉन नावाचा अकरा वर्षाचा मुलगा सहा महिन्यासाठी आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून रशिया हुन आला . आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून फिरताना आजगावच्या या शाळेने मात्र त्याला आकर्षित केले आणि त्याने आई-वडिलांकडे शाळेत प्रवेश करून देण्याचा हट्ट धरला .आता गेले महिनाभर मिरॉन येथील मुलांबरोबर चक्क मराठीमध्ये शिक्षण घेतो आहे. वर्गातील मित्रांबरोबर खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये रमतो आहे. विशेष म्हणजे मित्रांबरोबर संवाद साधताना भाषेचा कोणताही अडसर त्याला जाणवत नाही .
मिरॉन मराठीतले काही शब्द तसेच अंक तो लिहिण्या बोलण्यासाठी शिकला आहे . येथील भाषा, संस्कृती , खाद्यपदार्थ यावर तो प्रेम करू लागला आहे .त्याचा आवडता खाद्यपदार्थ वडापाव आहे . शाळेतली प्रार्थना देखील त्याने पाठ केली आहे . शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहार सुद्धा तो आवडीने खातो . महत्वाचे म्हणजे मिरॉनने स्वतःला पाहुणा विद्यार्थी म्हणून कोणतीही विशेष वागणूक न देण्याची विनंती शिक्षकांना केली आहे . शाळेतील सर्व शिक्षक सुद्धा त्याच्या समरसतेचे कौतुक करतात आणि त्याला आवडीने शिकवतात.
मिरॉनची आई डायना यांनी भारत देश सुरक्षित देश असल्याचे सांगितले . तसेच येथील शाळांचे वातावरण , शिक्षक आणि सभोवतालीच लोक हे शैक्षणिक विकासासाठी पोषक असल्याचे त्या बोलल्या आणि म्हणूनच त्यांनी मिरॉनला येथे प्रवेश घेतला.
भारतीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे आणि याचे पालन ही जिल्हा परिषद शाळा करत आहे. भारतीय समाज जीवनाशी एकरूप झालेला मिरॉन खऱ्या अर्थाने भारत – रशिया मैत्रीचा छोटा दूत आहे .
Byte 1 – ममता जाधव , मुख्याध्यापिका ,आजगाव शाळा
Byte 2 – डायना , मिरॉनची आई