सिंधुदुर्ग – गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे पूजन हा कोकणातील महिला भगिनींचा सण आहे. या दिवशी कोकणातील महिला उपवास करतात. आज हरतालिका देवीच्या पूजनाने या सणाला सुरवात झाली अर्थात हरतालिका पूजनाने कोकणातील गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका आणि आपल्या पाटील दीर्घायुष्य लाभावे म्हणून विवाहित महिला हरतालिकेचे मनोभावे व्रत करतात.
कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सवाला अवघे काही तास उरले आहेत. गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर कोकणातील प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हरितालिकेचं पूजन केले जाते. भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. कुमारिका आणि महिला हे व्रत करतात.
हरतालिका हे व्रत पार्वतीने शंकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी केले होते असे मानले जाते. तेव्हांपासून आपल्याला जोडीदार मनासारखा व चांगला मिळावा म्हणून कुमारिकांनी हे व्रत करावे असा प्रघात आहे.
मंगळागौरीच्या पूजेप्रमाणेच हिरव्या बांगडया २, कंगवा, आरसा, कुंकू, करंडा इ. साहित्य आणून पूजा करतात. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागात हरितालिकेचे पूजन केले जाते. हरितालिका व्रताचरणात संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आज हरितालिका पूजन केले जाते.



