पणजी :सरकार आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत सर्व मंत्री राज्यातील अकरा तालुक्यांत एक दिवसाचा दौरा करणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने लोकांच्या समस्या, अडचणी आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी या दौऱ्यांचे आयोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकार आपल्या दारी हा उपक्रम राबवला होता. मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमास राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला होता.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सामाजिक योजना, उपक्रम आणि नियोजित विकासकामे याची माहिती लोकांची भेट घेऊन देण्यात येणार आहे.
६ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान हे दौरे होणार असून दि. ६ रोजी मंत्री सुदिन ढवळीकर डिचोली तालुक्याचा दौरा करणार आहेत. दि. ७ रोजी मंत्री रवी नाईक सांगे तालुक्याचा, मंत्री गोविंद गावडे सासष्टीचा, मंत्री निळकंठ हळर्णकर मुरगावचा दौरा करणार आहेत.
दि. १० रोजी मंत्री विश्वजित राणे पेडणे तालुक्याला, मंत्री निलेश काब्राल सत्तरीला तसेच मंत्री बाबुश मोंसेरात फोंडा तालुक्याला भेट देतील. मंत्री सुभाष फळदेसाई दि. १२ रोजी बार्देश तालुक्यातील नागरिकांशी तर दि. १३ रोजी मंत्री सुभाष शिरोडकर धारबांदोडा तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
दि. १४ रोजी मंत्री माविन गुदिंन्हो काणकोण तालुक्याला तर मंत्री रोहन खंवटे केपेला भेट देणार आहेत.
दरम्यान, या दौऱ्यावेळी मंत्री तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधणार असून यावेळी त्यांच्या समस्या, अडचणी आणि प्रश्न जाणून घेणार आहेत. याचबरोबर सरकारी योजना आणि उपक्रमांची माहिती देणार आहेत. यावेळी मंत्र्यांसोबत संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. गेल्या दहा वर्षांत भाजपाने केलेली विकासकामे आणि नियोजित प्रकल्प याविषयी लोकांना माहिती दिली जाणार असून लोकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण केले जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करत असलेल्या लोकाभिमुख कामांची नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.