२७ जानेवारीच्या रात्री नेमकं काय घडलं? अजित पवारांच्या सचिवांकडे गुन्हे अन्वेषण शाखेचा प्रश्नांचा भडिमार

0
30

मुंबई- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा छडा लावण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने (CID) आता तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. या तपासाचा एक भाग म्हणून अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवड यांची आज तब्बल ४ तास कसून चौकशी करण्यात आली. २७ जानेवारीच्या त्या दुर्दैवी रात्री नेमके काय घडले आणि त्यापूर्वीच्या हालचाली काय होत्या, याचा सविस्तर तपशील शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत. या दीर्घ चौकशीदरम्यान संबंधित दौऱ्याचे नियोजन कोणी केले, प्रवासाचा अंतिम आराखडा कसा तयार झाला आणि अपघाताच्या आदल्या दिवशी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली होती, अशा अनेक महत्त्वाच्या पैलूंवर सोलवड यांच्याकडून माहिती घेण्यात आली.

हा अपघात केवळ एक तांत्रिक बिघाड होता की त्यामागे मानवी चूक किंवा अन्य काही संशयास्पद कारण होते, या दिशेने सध्या तपास सुरू आहे. गुन्हे अन्वेषण शाखेकडून उपलब्ध असलेल्या तांत्रिक नोंदी, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी आणि विमानातील तांत्रिक तपशील यांची बारकाईने पडताळणी केली जात आहे. विशेषतः सचिवांकडे झालेल्या या चौकशीतून दौऱ्याच्या नियोजनातील काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी प्रशासन सर्व तांत्रिक आणि मानवी पैलूंचा सखोल अभ्यास करत असून, आगामी काळात आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here