“हा केवळ अपघात नाही, तर मोठा घातपात!” अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा

0
3

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र हादरलेला असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात घातपाताची शक्यता वर्तवून मोठी खळबळ उडवून दिली आहे. हा अपघात नैसर्गिक नसून त्यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

 

ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रणामुळेच या घटनेचे गांभीर्य जगासमोर आले असून, जर हे फुटेज नसते तर हा अपघात सामान्य तांत्रिक बिघाड म्हणून दाबला गेला असता, असा थेट आरोप रोहित पवारांनी केला आहे. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी विमानाचा आवाज अतिशय विसंगत आणि संशयास्पद येत होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 

विमानाची तांत्रिक बाजू मांडताना रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. लेअरजेट (बंबार्डिअर) सारखे अत्याधुनिक आणि ५१,००० फुटांपर्यंत उडू शकणारे विमान कोसळतेच कसे, असा सवाल त्यांनी केला. या विमानाचे उड्डाणापूर्वी रीतसर इन्स्पेक्शन झाले होते का आणि ते करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी का झाली नाही, अशी विचारणा त्यांनी सरकारला केली आहे. विशेष म्हणजे, अपघाताच्या दोन दिवस आधी हे विमान ‘मुंबई-सुरत-मुंबई’ अशा मार्गावर का फिरले होते आणि त्या प्रवासाचा नेमका उद्देश काय होता, यावरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

 

या भीषण घटनेच्या स्मृती जागवताना रोहित पवार कमालीचे भावूक झाले होते. “दादांचे घड्याळ नेहमी १५ मिनिटे पुढे असायचे, मात्र अपघात झाला तेव्हा ते बरोबर ९ वाजता बंद पडले होते,” असे सांगताना त्यांनी घटनास्थळी सापडलेला जळलेला स्वेटर आणि चप्पल पाहून मन सुन्न झाल्याची भावना व्यक्त केली. दादा परत येतील अशी आशा सहा दिवस वाटत होती, असेही ते म्हणाले. दरम्यान, ज्या व्हीएसआर (VSR) कंपनीचे हे विमान होते, त्या कंपनीच्या मालकी हक्काबाबतही त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. कागदावर केवळ तीन शेअर होल्डर्स दिसत असले तरी प्रत्यक्षात २७ भागीदार असून वेळ आल्यास त्यांची नावे उघड करण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here