सौंदर्यामागचा मृत्यूचा सापळा ! या बीचवर वाढतोय धोका

0
3

कोकण – देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालणारा रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्रकिनारा आज सौंदर्याइतकाच धोक्यामुळेही ओळखला जाऊ लागला आहे. निळ्याशार समुद्राच्या लाटा, शुभ्र वाळू आणि नारळीच्या रांगा पाहून भारावलेले पर्यटक बेफिकिरीने समुद्रात उतरतात आणि हीच चूक अनेकांच्या जीवावर बेतत आहे.

दिसायला शांत आणि आकर्षक वाटणारा काशिद समुद्र प्रत्यक्षात मात्र धोकादायक प्रवाह, अचानक उसळणाऱ्या लाटा आणि वाळूखालील खोल खड्ड्यांनी भरलेला आहे. गेल्या काही वर्षांत येथे बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली असून आतापर्यंत 250 हून अधिक पर्यटकांचा बळी गेल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे मद्यपान करून समुद्रात उतरणे, खोल पाण्यात जाण्याचा अतिरेक आणि इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे ही बहुतांश दुर्घटनांची मुख्य कारणे ठरत आहेत.

1998 मध्ये पहिली दुर्घटना घडल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या वतीने सूचना फलक, आवाहने आणि खबरदारीचे इशारे देण्यात येत असले तरी मौजमजेच्या नादात त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सेल्फीचा हट्ट, थराराचा मोह आणि नियमभंग यामुळे कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून काशिदची ओळख ‘मिनी गोवा’वरून ‘धोकादायक समुद्रकिनारा’ अशी होत चालली आहे.

या वाढत्या दुर्घटनांचा फटका स्थानिक पर्यटन व्यवसाय, हॉटेल व्यावसायिक आणि परिसराच्या अर्थकारणालाही बसू लागला आहे. काशिदचे सौंदर्य टिकवायचे असेल आणि जीवितहानी थांबवायची असेल तर पर्यटकांनी जबाबदारीने वागणे आणि प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here