मडगाव ः ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध राज्यांतून गोव्यात दाखल होणाऱ्या सॅपेक टाकरो संघांचे गोवा सॅपैक टाकरो असोसिएन व
भारतीय सॅपेक टाकरो महासंघाचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी स्वागत केले.
दिल्लीच्या संघासह आज गोव्यात आगमन झालेल्या ५ राज्यांतील संघांचे कवळेकर यांनी मडगाव रेल्वे स्थानकावर स्वागत केले. यावेळी गोवा सॅपेक टाकरो असोसिएशनचे
सरचिटणीस सूरज देसाई, खजिनदार मनोज तारी, दिल्ली संघाचे प्रशिक्षक हेमराज उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या अथक परिश्रमातून गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे शानदार आयोजन झाले आहे. भारतातील २४ राज्यांचे सॅपेक टाकरो संघ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असून हे सर्व संघ आपल्या कामगिरीच्या सर्वोत्कृष्ट
प्रदर्शनासाठी सज्ज आहेत, असे कवळेकर यांनी सांगितले.
सॅपेक टाकरो सामने ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत होणार आहेत. सर्व संघांकडून चांगल्या कामागिरीची अपेक्षा असून सर्व संघांना यशस्वी कामगिरीसाठी कवळेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
गोवा सॅपेक टाकरो असोसिएशन व भारतीय सॅपेक टाकरो महासंघातर्फे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी केलेल्या स्वागतामुळे खेळाडुंना हुरूप आला असून
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या खेळाडुंकडून सर्वोत्तम कामगिरी होणार असल्याचा विश्वास दिल्ली सॅपेक टाकरो संघाचे प्रशिक्षक हेमराज यांनी व्यक्त केला.