सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा-काजू उत्पादकांचे नेतृत्व राजू शेट्टी करणार

0
2

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची आर्थिक मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या बैठकीत आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी एकदिलाने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. औषध फवारणी, खते, मजुरी आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, लाखो रुपयांचा खर्च होत असताना केवळ २२ हजार रुपयांची मदत अपुरी ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एका आंबा बागेचा वार्षिक खर्च पाहता ही रक्कम फवारणीच्या एका टप्प्यासाठीही पुरेशी नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

वारंवार होणाऱ्या नैसर्गिक नुकसानीमुळे कोकणातील शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. अशा परिस्थितीत सरकारची मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची टीका करण्यात आली. तसेच पीकविमा कंपन्यांकडून होत असलेल्या अन्यायकारक वागणुकीबाबत आणि कर्जमाफीतील कठोर अटींबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

दरम्यान, ४ एप्रिल रोजी देवगड येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

या बैठकीस माजी आमदार बाळा माने, सुशांत नाईक, राजेंद्र गड्यान्नावर, विनायक कदम, प्रकाश साळवी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here