कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील आणखी चार व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्हय़ात सद्यस्थितीत एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. मात्र प्रशासकीय यंत्रणेने खबरदारीच्या उपाययोजना कायम सुरू ठेवून सर्वांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आणखी 25 खाटांची सुविधा निर्माण केली असून आता एकूण 100 खाटांची उपलब्ध झाली आहे. होम क्वॉरंटाईन केलेल्यांमधून 85 व्यक्तींना मुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे दिली.
जिल्हय़ात 358 व्यक्तींना घरीच विलगीकरण करण्यात आले असून 53 व्यक्ती या संस्थात्मक विलगीकरण कक्षांमध्ये आहेत. विलगीकरण कक्षामध्ये 15 व्यक्ती दाखल असून 85 व्यक्तींचे 28 दिवसांचे विलगीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच 14 दिवस विलगीकरण कक्षामध्ये आणि 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये अशा प्रकारे 28 दिवसांचे विलगीकरण पूर्ण झाले असून त्यांना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत एकूण 2191 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या एका व्यक्तीचा नमुना तपासणी अहवाल येणे बाकी होता. त्यानंतर आणखी तीन रुग्णांचे नमुने मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आता या चारही व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 66 नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यातील 65 नमुन्यांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. एकमेव रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह अहवाल आला आहे. जिल्हय़ात आता कोरोनाचे सावट दूर झाले असे वाटत असले, तरी सर्व प्रशासकीय यंत्रणेने गेल्या 15 दिवसांत ज्या पद्धतीने दिवस-रात्र काम केले आहे, त्याच पद्धतीने याही पुढे सतर्क राहून काम करायचे आहे. जोपर्यंत लॉकडाऊन हटविले जात नाही, तोपर्यंत जिल्हय़ात आहे तिच परिस्थिती राहणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हय़ातील नागरिकांनीही स्वत:हून काळजी घ्यावी. घरातून बाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनापासून दूर राहावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
आयसोलेशन वॉर्डमध्ये 100 खाटांची सुविधा
जिल्हय़ात कोरोनाबाधित एकही रुग्ण नसला, तरी जिल्हय़ातील नागरिकांची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. जिल्हय़ात कोरोनाची किरकोळ जरी लक्षणे दिसली, तरी त्यांची काळजी घेण्यात येत आहे. तसेच गरज पडल्यास आयसोलेशन वार्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून याच अनुषंगाने जिल्हा रुग्णालय येथील विलगीकरण कक्षामध्ये आणखी 25 खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली असून आता या विलगीकरण कक्षामध्ये 100 खाटांची सुविधा उपलब्ध झाली आहे.
आरोग्य यंत्रणेचे जिल्हावासीयांकडून आभार
जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हय़ातील सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, आरोग्य सेवक तसेच जिल्हय़ातील नागरिकांच्या आरोग्याचा सर्व्हे करणाऱया आशा वर्कर्स, एएनएम व एमपीडब्ल्यू, विशेषतः जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड-19 वॉर्डमध्ये सेवा बजावत असलेले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेविका-सेवक हे कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदैव कार्यरत आहेत. स्वतःच्या जीवाची चिंता न करता सदैव कार्यतत्पर असणाऱया व कोरोनाशी दोन हात करणाऱया सर्व डॉक्टर व कर्मचारी यांचे जिल्हा प्रशासन व जिल्हावासियांनी आभार मानले आहेत. तसेच जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
10 ठिकाणी शिवभोजन केंद्र
लॉकडाऊनमुळे जिल्हय़ात अडकलेल्या मजूर, कामगार आणि बेघर यांच्यासाठी 15 ठिकाणी कॅम्प उभारण्यात आले असून त्याठिकाणी 558 व्यक्तींची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. जिल्हय़ात एकूण 10 ठिकाणी शिवभोजन केंद्रे स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून बेघर आणि मजूर कॅम्पमधील लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
घरीच विलगीकरण 358
संस्थात्मक विलगीकरण 053
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 066
अहवाल प्राप्त झालेले नमुने 066
पॉझिटिव्ह आलेले नमुने 001
निगेटिव्ह आलेले नमुने 065
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह नमुने 000
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 015



