सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला कोरोनाचा पाॅॅझिटीव्ह रुग्ण सापडला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या रुग्णाने १९ मार्चला आलेल्या मंगलोर एक्सप्रेसने एस ३ डब्यातून प्रवास केला होता.
मंगलोर एक्सप्रेसमधून आलेल्या प्रवाशांची माहिती कोकण रेल्वेच्या प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला दिली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कणकवली रेल्वे स्टेशनवर तपासणी केली. या तपासणीनंतर त्या सर्व प्रवाशांना होम कोरोनटाईनच्या सुचना दिल्या होत्या. यानंतर जिल्हा प्रशासनाने मंगलोर एक्सप्रेसमधील एस ३ या डब्यातून प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला होता. विशेष म्हणजे आता पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रेल्वे प्रवाशाच्या आईला खोकला असल्याने तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वेतून प्रवास केलेल्या तिच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी दोघांंचेही स्वाब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. त्याची माहिती गुरुवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार मुलाचा रिपोर्ट कोरोना पोझीटिव्ह निघाला आहे. तर आईसह इतर चार जणांचे पाठविलेले रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी माहिती दिली.
दरम्यान पाॅॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सापडलेला पाॅॅझिटीव्ह रुग्ण होम कोरोनटाईन असल्यामूळ इतर कोणाच्या संपर्कात आला नाही. मात्र प्रवास करताना त्याच्या सोबत आलेली त्याची बहिण २१ मार्चला मुंबईला गेली आहे. जिल्हा प्रशसनाने तातडीने मुंबईच्या यंत्रणेला यावबत माहिती दिली आहे. बहिणीला तपासणीसाठी मुंबईची यंत्रणा ताब्यात घेणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.