सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील ओरोस परिसरातील ‘सिंधुदुर्गनगरी’ आता स्वतंत्र महसुली गाव म्हणून अस्तित्वात आले आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जाहीर केली असून, १ जानेवारी २०२६ पासून हे नवीन महसुली गाव अधिकृतपणे कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण महसुली गावांची संख्या ७५९ इतकी झाली आहे.
‘सिंधुदुर्गनगरी’ या नव्या महसुली गावाची निर्मिती ओरोस बुद्रुक, अणाव आणि रानबांबुळी या तीन गावांमधील एकत्रित ३३४.२०.२० हेक्टर क्षेत्रातून करण्यात आली आहे. या भागाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्यात आल्याने तो राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रशासकीय नकाशावर स्वतंत्रपणे नोंदवला जाणार आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना महसूल तसेच ग्रामविकास विभागाशी संबंधित विविध कामकाजासाठी अधिक सुलभता मिळणार आहे.
प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नवीन महसुली गाव तयार करताना केवळ प्राधिकरणाच्या ताब्यातील क्षेत्राचाच समावेश करण्यात आला आहे. मूळ तीन गावांच्या उर्वरित हद्दीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि त्यांची महसुली रचना पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे.
स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळाल्यामुळे सिंधुदुर्गनगरी परिसराचे प्रशासकीय महत्त्व वाढणार असून, विविध विकासकामे आणि शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहेत. प्रशासनिक प्रक्रिया वेगवान होऊन नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या निर्णयासंबंधीची अधिसूचना लवकरच राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.



