सिंधुदुर्ग – जिल्ह्यात पुर्ण झालेल्या अनेक धरण प्रकल्पांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये क्षमतेनुसार पाणीसाठा होत आहे; परंतु हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचविणारे कालव्यांची कामेच हाती न घेतल्यामुळे धरणातील पाणी वाया जात आहे. कालव्यांअभावी जिल्ह्याची सिंचनक्षमतेत देखील वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे आता धरणांपेक्षा झालेल्या धरणांचे कालवे पूर्ण करण्याची गरज आहे.
सिंधुदुर्गात मोठा एक, मध्यम तीन आणि लघु २८, असे सिंचनाचे एकूण ३२ प्रकल्प आहेत. तिलारीचा (ता. दोडामार्ग) मोठा प्रकल्प पर्णू झाला आहे तर कुर्ली घोणसरी (ता. वैभववाडी-कणकवली) कोर्ले सातेंडी (ता. देवगड) आणि अरूणा (ता. वैभववाडी) हे तीन मध्यम प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यातील अरूणा प्रकल्पाची घळभरणी मे २०१९ मध्ये झाली. उर्वरित दोन्ही प्रकल्प पूर्ण होऊन सुमारे पंधरा ते वीस वर्षांचा कालावधी लोटला आहे. याशिवाय जिल्ह्यातील २८ लघु प्रकल्पांनाही अनेक वर्षे झाली आहेत.
जिल्ह्यात एक मोठा आणि तीन मध्यम प्रकल्प असे मोठा पाणीसाठा होणारे हे चार प्रकल्प आहेत. एका एका प्रकल्पांची चार हजार ते पाच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनक्षमता आहे. त्यामुळे या चार प्रकल्पाचे कालवे पूर्ण झाले असते तर जिल्ह्यातील सुमारे २० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकले असते; परंतु यातील कोणत्याच प्रकल्पाचे कालवे पूर्ण झालेले नाहीत. जिल्ह्याची सध्याची सिंचनाबद्दलची स्थिती अतिशय बिकट आहे. धरणालगत एक, दीड दोन किलोमीटरच कालव्याची कामे पूर्ण केली आहेत. या कालव्यांलगतच्या शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळते. उर्वरित पाणी हे नदीला सोडून दिले जाते. एकीकडे पाणी नाही म्हणून शेतकरी तळमळत असताना कोट्यावधी रूपये खर्चुन साठा केलेले पाणी मात्र कालवे नसल्यामुळे वाया जात असल्याचे जिल्ह्यात चित्र पाहायला मिळत आहे.



