सिंधुदुर्ग – कोरोनावर मात करीत बरे झालेल्या आणखी 13 रुग्णांना सोमवारी एकाच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्हय़ात आतापर्यंत 297 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत कोरोना सक्रिय 101 रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी दिली. दरम्यान जिल्हय़ात चाकरमान्यांचा ओघ सुरू झाला असून तीन दिवसांत 10 हजार व्यक्ती जिल्हय़ात दाखल झाल्या आहेत.
जिल्हय़ात कोरोना बाधित एकूण रुग्णसंख्या 406 एवढी आहे. पैकी 297 कोरोना मुक्त झाले आहेत. सहाजणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह तेरा रुग्ण आढळले. त्यामध्ये कणकवली तालुक्मयातील नांदगावमधील सहा, तळेरे येथील तीन, वागदे येथील एक, देवगडमधील एक, मालवण तालुक्मयातील वराडमधील एक आणि दोडामार्ग तालुक्मयातील मांगेली येथील एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
कंटेनमेंट झोन
कणकवली तालुक्मयातील मौजे नवी कुर्ली वसाहत येथील मारुती पाटील यांचे घर व 100 मीटरचा परिसर तसेच देवगड तालुक्मयातील जामसंडे-तरवाडी येथील प्रकाश जनार्दन दहिबावकर यांचे घर व 50 मीटर परिसर या दोन्ही ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
दरम्यान या कंटेनमेंट झोनमध्ये ठरवून दिलेल्या कालावधीत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.