सिंधुदुर्ग जिल्हा हादरला, सावंतवाडीत दोन वृद्ध महिलांचा खून पोलीस घटनास्थळी दाखल; कारण अस्पष्ट

0
127

 

सिंधुदुर्ग – जिल्हा भल्या पहाटे हादरला आहे. सावंतवाडी शहरामध्ये उभा बाजार येथे दोन वृद्ध महिलांचा खून करण्यात आला ही बातमी जिल्हा सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हे खून कोणी व का केले हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

दोन्ही वृद्ध महिलांचे खून

सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात दोन वृध्द महिलांचा खून करण्यात आला आहे. धार-धार वस्तूने हा खून झाला आहे. नेमका कसा प्रकार झाला, हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली. नीलिमा नारायण खानविलकर (वय ८०) व शालिनी शांताराम सावंत (वय ७५) असे मृत दोघा व्यक्तींची नावे आहेत. यातील शालिनी या खानविलकर यांच्याकडे केअरटेकर म्हणून काम करत होत्या.

रक्ताच्या थारोळ्यात होते मृतदेह

याबाबतची अधिक माहिती माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी दिली. ते म्हणाले, या ठिकाणी असलेल्या खानविलकर या माझ्या जवळच्या नातेवाईक आहेत. मी त्यांची विचारपूस करण्यासाठी व आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांना घरी टीव्ही लावून देण्यासाठी आलो असता हाक मारल्या नंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मी थेट घरात गेलो त्यावेळी त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. हा सर्व प्रकार पाहून मी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याला फोन करून दिली. हा प्रकार अज्ञात चोरट्याकडून झाला असावा, त्यांच्या गळ्यात सोन्याच्या चैन होत्या. त्यामुळे सोन्यासाठी त्यांचा खून झाला असावा, असा संशय आहे,असे मसुरकर म्हणाले.

दोघांवरही धारदार शस्त्राने वार

याबाबतची खबर त्यांच्या भाच्याला दिल्या नंतर तो या ठिकाणी यायला निघाला आहे.
यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांना विचारले असता दोघांवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. दोघे रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडून आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. मात्र नेमका खून का झाला याबाबत तपास करण्यात येणार आहे. तर अधिक तपासासाठी फोरेन्सिक एक्सपर्ट बोलविण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here