सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बंधने, सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची ४ फूट, तर घरगुती २ फुटाची करण्याच्या सूचना

0
190

 

सिंधुदुर्ग – गणेशोत्सवादरम्यान श्रींच्या मूर्तीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये, तसेच आरती, भजन व किर्तनाचे कार्यक्रम घरीच करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सव २०२० साठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांकरिता गणेश मूर्तीची उंची ४ फूट, तर घरगुती गणपती करिता मूर्ती २ फुटांची असेल. असे या सूचनांमध्ये म्हटले आहे.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या सूचनांमध्ये असे म्हटले आहे कि, जिल्ह्यात येण्यासाठी एस.टीने प्रवास करणाऱ्यांसाठी वेगळ्या ई-पासची गरज भासणार नाही. इतर खाजगी वहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पास सक्तीचा असणार आहे. सदर पास covid19.mahapolice.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. दिनांक १२ ऑगस्ट २०२० पर्यंत गणेशोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांना १० दिवस गृह अलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यासाठी नागरिकांना कोणत्याही कोविड – १९ च्या तपासणीची आवश्यकता नाही. दिनांक १२ ऑगस्ट २०२० नंतर जे नागरिक जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत त्यांना किमान ४८ तास आधी कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असने गरजेचे आहे. तसेच या व्यक्तींन ३ दिवस घराबाहेर पडू नये, स्थानिक आरोग्य विभागाने त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याची खात्री करावी. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची नाक्यावरच तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने पुरेशा प्रमाणात पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर, रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट किट तपासणी नाक्यावर उपलब्ध करुन द्यावे. आजाराची लक्षण आसणाऱ्या व्यक्ती, दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्ती यांची रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी तालुका पातळीवरील संबंधित गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांच्या बैठका घ्याव्यात. सदर बैठकीस गाव, वॉर्ड नियंत्रण समितीच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करावे. गणेशोत्सव कालावधीत पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याबाबतचे नियोजन करावे व संबंधितांना याबाबत अवगत करावे. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कोवीड केअर सेंटर ची क्षमता वाढवावी. सर्व तहसिलदार यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करावी. तसेच सीसीसीची क्षमता वाढविण्यासाठी व सोयी देण्यासाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी संबंधित तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडून परवनागी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकरिता गणेश मूर्तीची उंची ४ फूट, तर घरगुती गणपती करिता मूर्ती २ फुटांची असेल. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसंर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेल्या आदेश आणि संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षीत असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाज पणा नसावा. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश दर्शनासाठी गर्दी होणार नाही. तसेच प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भावीक, शारिरीक अंतराचे, स्वच्छतेचे नियम त्यात मास्क, सॅनिटायझर वापरणे पाळतात याची खात्री मंडळाचे अध्यक्ष यांनी करावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाचे तसेच थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था करण्यात यावी. श्री गणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, केबल, वेबसाईट, फेसबूक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडळास भेट देणाऱ्या व्यक्तींची नोद ठेवावी. जेणेकरून बाधीत रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोपे होईल. उत्सव कालावधीत गणेश मंडळा बाहेर हार, नारळ, मिठाई दुकाने लावण्यात येऊ नयेत. यंदा गणेशोत्सव कमीत कमी दिवसांचा साजरा करावा. घरगुती गणपतीची पूजा शक्यतो स्वतःच करावी. पुरोहित (भटजी) यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन ( व्हीडिओ ॲप्स ) तंत्रज्ञानाचा वापर करावा. गणेशोत्सव कालावधीत भजन, आरती, फुगडी, किर्तन, गौरी वोवसा इ. कार्यक्रम घरगुती स्वरुपात कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करावेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरोघरी फिरून भेटी देणे टाळावे. विसर्जनावेळी पारंपारिक पद्धतीने विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, वाडीतील, गावातील, इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित पणे काढण्यात येऊ नये, शक्यतो घरा जवळच्याच विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करावे. विसर्जनावेळी कोवीड १९ बाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करावे याबाबत गाव समिती, प्रभाग समिती यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात खबरदारी घ्यावी.

उपरोक्त आदेश कंटेन्मेंट झोनमध्ये लागू राहणार नाहीत. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी लागू केलेले प्रतिबंध लागू असणार आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here