सिंधुदुर्ग – जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे, राज्याचे मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचा करिष्मा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ५० जागांच्या जिल्हा परिषदेत महायुतीने तब्बल ४० जागा काबीज करत विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने २७ जागांसह सर्वात मोठ्या पक्षाचा मान मिळवला असून, शिंदे यांच्या शिवसेनेने १३ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून त्यांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत ७ अपक्ष उमेदवारही निवडून आले असून, त्यातील एका उमेदवाराला शिंदे गटाने पाठिंबा दिला होता.
निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच महायुतीने आपली ताकद दाखवून दिली होती, कारण ५० पैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये भाजपचे ७ आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका उमेदवाराचा समावेश होता. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली. वैभववाडी, कणकवली आणि देवगड या पट्ट्यात भाजपचे वर्चस्व दिसून आले, तर मालवण, कुडाळ आणि दोडामार्गमध्ये शिंदे गटाने चांगली कामगिरी केली. वेंगुर्ला आणि सावंतवाडीत अपक्ष उमेदवारांनीही आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. वैभववाडीतील कोळपे आणि कोकिसरे या जागांसह देवगडमधील सर्व महत्त्वाच्या जागांवर भाजपचे कमळ फुलले आहे.
सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसरात काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी अनपेक्षित विजय मिळवल्याने राजकीय समीकरणे चर्चेत राहिली. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पिंगुळी, आडेली आणि उभादांडा या केवळ तीनच जागांवर विजय मिळवता आला. या विजयानंतर नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून, हा विजय जनतेने विकासकामांवर टाकलेला विश्वास असल्याचे म्हटले आहे. या निकालामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे कुटुंबियांची पकड अधिक घट्ट झाली असून महायुतीचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.



