सिंधुदुर्ग- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने पक्षशिस्तीचा कठोर पवित्रा घेत बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणे व पक्षविरोधी भूमिका घेणे या कारणांमुळे जिल्ह्यातील २३ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमधून तब्बल ६ वर्षांसाठी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर करत पक्षशिस्तीशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये महायुती असतानाही, काही पदाधिकाऱ्यांनी युतीचा धर्म पाळला नाही. महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर अडथळे निर्माण होतील, अशा प्रकारे संबंधितांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. या प्रकारामुळे पक्षात तीव्र नाराजी पसरली होती. अखेर पक्ष नेतृत्वाने कठोर भूमिका घेत बंडखोरांविरोधात थेट कारवाई केली.
पक्षाने याआधीच शिस्तभंग करणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जातील, असा स्पष्ट संदेश दिला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याने आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये शिस्तीचा बडगा उगारण्यात आला आहे, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
निलंबित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे :
राजन बाळकृष्ण चिके (फोंडा, कणकवली), राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर (कोनाळकट्टा, दोडामार्ग), सुजाता अजित पडवळ (तुळस, वेंगुर्ला), वंदना किरण विजाळेकर (म्हापण, वेंगुर्ला), विजय महादेव रेडकर (मातोंड, वेंगुर्ला), जनार्दन रुक्मानंद कुडाळकर (आडेली, वेंगुर्ला), डायगो (मायकल) फ्रान्सिसी डिसोजा (कोलगाव, सावंतवाडी), जितेंद्र पांडुरंग गावकर (माजगाव, सावंतवाडी), योगेश अशोक केणी, स्वागत रघुवीर नाटेकर, नितीन एकनाथ राऊळ (इन्सुली, सावंतवाडी), शर्वाणी शेखर गावकर (आरोंदा, सावंतवाडी), उल्हास उत्तम परब (साताडी, सावंतवाडी), स्नेहल संदीप नेमळेकर (आरोंदा, सावंतवाडी), साक्षी संदीप नाईक, सुप्रिया शैलेश नाईक, सुनीता कमलाकर भिसे, प्रवीण नारायण गवस, अनिरुद्ध फाटक (दोडामार्ग), सुश्मिता अरविंद बांबर्डेकर (ओरोस, कुडाळ), योगेश राजाराम तावडे (ओरोस, कुडाळ), रुपेश अशोक पावसकर (नेरूर, कुडाळ) आणि विजय वासुदेव नाईक (आडेली, वेंगुर्ला).



