सिंधुदुर्ग – कोव्हीड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी व जिल्ह्यात मनाई आदेश असतानाही अनधिकृत रित्या ठासणीची बंदूक तसेच इतर साहित्य मोटार सायकलवरून घेवुन जाणाऱ्या तुषार टेंबुलकर (वय ३०, रा. कुडाळ कविलगाव) व वैभव मोर्ये (वय २३, रा. आंदुर्ले कापडोस) यांना निवत्ती पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी त्यांच्या कडील बंदूक व मोटारसायकल सहित सुमारे ४१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली.
याबाबत निवत्ती पोलीस ठाण्यातून अधिक माहिती देण्यात आली की, बुधवारी रात्री निवती पोलीस ठाण्याचे पोलीस एच. बी. मिशाळ, डी. ए. गावडे व एक होमगार्ड हे आंदुर्ले मार्गावर गस्त घालीत होते. या दरम्याने आंदुर्ले खिंड येथील मार्गावर मोटारसायकल वरून टेंबुलकर व मोर्ये हे जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना तपासणीसाठी थांबवले असता त्यांच्या जवळ गन पावडर, बंदुकीतील छर्रे तसेच इतर काही साहित्य सापडून आले.
सध्या कोव्हीड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी व मनाई आदेश असतानाही अनधिकृतपणे सदर बंदुकीची वाहतूक करताना हे आढळून आल्याने या दोघांनाही निवती पोलीस आणि पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनानुसार अटक केली. तसेच त्यांच्या जवळील ठासणीची बंदूक गन पावडर व मोटारसायकल मिळून ४१ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला टेंबुलकर व मोर्ये यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



