एकावर केला हल्ल तर शेतकऱ्यांचा केला पाठलाग, भातशेतीचे मोठे नुकसान
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सध्या गवा येड्यानी धुमाकूळ घातला आहे. शेतीचे नुकसान करतानाच लोकांवर हल्ला करण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, मालवण, देवगड या तालुक्यात सध्या या रान गव्यांचे कळप सक्रिय आहेत.
ओटवणे येथील युवक गंभीर
गव्याने हल्ला केल्याने ओटवणे येथील युवक गंभीर जखमी झाला आहे.त्याच्या छातीला शिंग लागल्याने तो जखमी झाला आहे. शंकर नाना गावकर (वय ३४) असे त्याचे नाव आहे. हा अपघात ओटवणे- चराठा रस्त्यावर घडला. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती चराटे ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी दिली आहे.
नाटळ मध्ये गवा रेड्यांकडून पाठलाग
गवा रेड्यांना हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा गवारेडयांनी पाठलाग केला. शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पळावे लागले तर काही झाडावर चढले. गवारेडयांच्या या हल्ल्यामुळे नाटळ पंचक्रोशीत भीतीचे वातावरण आहे. नाटळ गावातील पिंपळाचा माळ आणि थोरले मोहूळ या परिसरात गवारेड्यांच्या कळपांचा व सांबरांच्या कळपाचा मुक्त संचार सुरु झाला आहे. यांना हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा गवारेडयांनी पाठलाग केल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पळावे लागले यामुळे शेतकरी थोडक्यात बचावले आहेत. नाटळ येथील शेतकरी तुळाजी राणे, जितेंद्र सावंत, दीनानाथ सावंत हे आपल्या शेतात आलेल्या गवारेडयांच्या कळपाला हुसकावून लावण्यासाठी गेले असता गवारेडयांनी त्यांचा पाठलाग केला. झाडावर चढल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. त्या मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळाचा माळ येथील जितेंद्र सावंत, दीनानाथ सावंत, तुळाजी राणे, प्रसाद पाताडे, नलेश परब, सुधीर गुडेकर, निलेश सावंत, मनोहर पाताडे यांच्या भात शेतीत गवारेडयांच्या व सांबरांच्या कळपांनी धुडगूस घालण्यास सुरवात केली आहे. तसेच थोरले मोहूळ येथील सत्यवान सावंत, प्रमोद शिरसाट यांच्या ही शेतात गवारेडयांनी धुडगूस घातला आहे. दरवर्षी येथील शेती ही रानटी प्राण्यांच्या भक्ष्य स्थानी पडत असून येथील शेतकरी मात्र नुकसान भरपाई पासून वंचीत राहत आहेत. या बाबत वनविभागाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेती ही सह्याद्री पट्यातील जगलांपासून नजिक असल्याने शेतकऱ्यांना अशा संकटांना वारंवार सामोरे जावे लागते .त्या मुळे दरवर्षीच्या होणाऱ्या नुकसानीला कंटाळून या वर्षी नाटळश सह्याद्री पट्यातील गावातील बहुतांश म्हणजे सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांनी भात शेती व इतर शेतीला रामराम केला आहे. दाजीपूर अभयारण्यातील गवारेड्यांचे कळप कोकणातील भात शेतीत घुसून सध्या धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे.
भात पेरणीपासून भात पीकेपर्यंत शेतकरी अनेक संकटांना तोंड देत असतो, अशातच जंगली जनावरांच्या धुमकुळाने तोंडी आलेला घास दूर होत आहे या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत . वनविभागाने याबाबत ठोसपावले उचलून शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे .


