सिंधुदुर्ग जिल्हय़ात अखेर कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. नव्याने आणखी 14 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत त्यामुळे जिल्हय़ात एकूण कोरोना बाधितांची संख्या 113 वर गेली आहे. जिल्हय़ात ठिकठिकाणी कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने 53 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत 20 हजार 706 जणांना होम क्वारंटाईन मुक्त करण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयामध्ये आतापर्यंत दाखल झालेल्या 1 हजार 329 व्यक्तींपैकी 1 हजार 225 व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 102 व्यक्ती जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात 4 जूनपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 99 होती. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा सहाजणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. सायंकाळी आठजणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे रुग्ण संख्या वाढून एकूण 113 झाली आहे. नव्याने आढळलेल्या 14 रुग्णांमध्ये देवगड तालुक्यातील नाडण येथील तीन, वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील एक आणि कणकवली तालुक्यातील पाचजणांचा समावेश आहे. यात कणकवली दोन, नाटळ एक, घोणसरी एक, हरकूळ एक. कुडाळ तालुक्यात तीन रुग्ण आढळले असून यामध्ये साळगाव एक, हिर्लोक एक, पडवे एक. मालवण तालुक्यामध्ये ओवळिये एक आणि सावंतवाडी तालुक्यात ओटवणे एक आदींचा समावेश आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण 113 रुग्णांपैकी 17 रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले असून सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ात सद्यस्थितीत 93 रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल आहेत.