कोरोना साथरोगाबाबत कोणत्याही प्रकारची अफवा किंवा खोटी माहिती तोंडी, लेखी, समाजमाध्यमांचा वापर करून पसरवीत असल्यास तो कायद्याने गुन्हा आहे. याबाबत शासन स्तरावरून देण्यात आलेल्या सूचनांनुसार तातडीने गुन्हा नोंद करण्यात येतो. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ब्रेकिंग मालवणी, सिंधु रिपोर्टर लाईव्ह आणि ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज या तीन लोकल न्यूज चॅनेेलनी कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात असलेबाबत खोटी माहिती कोणतीही खातरजमा न करता प्रसारित केली आहे. या वृत्तामुळे जनमानसात भीती व गैरसमज निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही वृत्त प्रसिद्ध केले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने तसेच कोरोना साथ रोगाबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवा व चुकीच्या वृत्तांना आळा घालण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संबंधीत तीन वृत्त वाहिन्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५४, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या अनुषंगाने शासनाने जाहिर केलेली अधिसूचना व भारतीय दंड विधान संहिता कायदा १८६० च्या कलम १८८ व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ब्रेकिंग मालवणी, सिंधु रिपोर्टर लाईव्ह आणि ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग या न्यूज चॅनेलवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.