सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७८ झाली आहे.त्यापैकी ३४१ रुग्ण घरी परतले आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे २२४ रुग्ण कणकवली तालुक्यात आढळले आहेत. त्यामुळे एक प्रकारे कणकवली तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कणकवली तालुक्यात नव्याने ६ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकूण २२४ संख्या झाली आहे. या सहा मध्ये कणकवली शहरातील ५ आणि कलमठ मधील एकाचा समावेश आहे. तालुक्यात सध्या गणेश चतुर्थीच्या तोंडावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असताना आता जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेले कणकवली हे शहर आणि लगतच्या गावात कोरोना रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कणकवली कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. सध्या कोकणात चाकरमान्यांची रीघ लागली असून जिल्ह्यातही मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. या चाकरमानी लोकांबरोबरच स्थानिक लोकांमधूनही मोठ्या संख्येने आता रूगन सापडू लागले आहेत. शिवसेना आमदार वैभव नाईक आणि युवा नेते संदेश पारकर यांच्या संपर्कातील रुग्ण संख्याही मोठी आहे. सध्या कणकवली बाजारपेठेसह शहरात अनेक ठिकाणी कंटेन्टमेंट झोन करण्यात आला आहे.
सध्या गणेश चतुर्थी काही दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यात कणकवली शहरालगत आणि तालुक्यातील कित्तेक गावांच्या खरेदीची मोठी बाजारपेठे म्हणून कणकवली कडे पाहिलं जात. मात्र या शहराला सध्या कोरोनाच्या संकटाने विळखा घातल्याने सर्वत्रच भीतीचे वातावरण आहे. देवगड येथे चाकरमान्यांना मुंबईहून घेऊन येणारे तीन खासगी बस चालक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर कुडाळ तालुक्यातील लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांची कोविड टेस्ट जलद करून मिळावी त्यांना दूरवर टेस्ट साठी जावे लागू नये याकरीता आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा शल्य चिकित्सक श्री. चाकूरकर जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.खलिफे यांच्याशी संपर्क साधून रॅपिड टेस्ट किट व टेक्निशियन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.त्यानुसार तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ येथील विश्रामगृहामध्ये कोविड१९ रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर सुरु करण्यात आले. दरम्यान कणकवलीत वाढत जाणारी रुग्ण संख्या सध्या चिंतेची बाब बनली आहे.



