कणकवली:जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये विरोधकांचे साधे बुथही लागलेले दिसत नाहीत, यावरूनच त्यांच्यात लढण्याची क्षमता उरली नसल्याचे स्पष्ट होत आहे. लोकशाहीत सक्षम पर्याय देण्याऐवजी विरोधक आता पूर्णपणे नाउमेद झाले असून ही निवडणूक महायुतीसाठी पूर्णपणे एकतर्फी असल्याचे चित्र दिसत आहे, असे मत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान सुरु झाले. वरवडे-फणसनगर येथील मतदान केंद्रावर पालकमंत्री नितेश राणे यांनी सकाळी ९:४५ वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला.
नितेश राणे यांनी यावेळी मतदारांना विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, गेल्या २७ वर्षांपासून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याने प्रगतीची नवी शिखरे ओलांडली आहेत. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ३५ हजारांवरून अडीच लाखांपर्यंत पोहोचले आहे, हे केवळ राणे साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार अत्यंत सक्षमपणे काम करत असून, जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाठी मतदार आम्हालाच आशीर्वाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही ठिकाणी उभे राहिलेल्या अपक्ष उमेदवारांचा समाचार घेताना त्यांनी स्पष्ट केले की, विकासाचा निधी आणण्यासाठी मंत्रालयापर्यंतची ताकद आणि सरकारचा पाठिंबा लागतो, जो केवळ महायुतीच्या उमेदवारांकडेच आहे. अपक्ष उमेदवार निवडून आले तरी ते निधी कुठून आणणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच मुंबईच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्या महापौरालाच मुंबईकरांनी पसंती दिल्याचे सांगत महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्यातील काजू आणि मासेमारी या मुख्य व्यवसायांना चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.



