सिंधुदुर्ग – देवबागसह आजूबाजूच्या गावातील रुग्णांची सेवा करण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायतीच्या वतीने रुग्णवाहिका आणणाऱ्या देवबाग ग्रामपंचायतीने आता मयत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अंत्यविधी होईपर्यंत सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने डेड बॉडी फ्रीझरची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली आहे. हा उपक्रम राबविणारी देवबाग ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग गाव हा नेहमीच जिल्ह्यात लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. यापूर्वी सन २०१८ मध्ये देवबाग गावच्या सरपंच जान्हवी खोबरेकर आणि उपसरपंच तमास फर्नांडिस यांनी देवबाग ग्रामपंचायत सदस्यांच्या साथीने आणि देवबागचे ग्रामसेवक युवराज चव्हाण यांच्या सहकार्याने देवबाग ग्रामपंचायतीची स्वतःची अशी रुग्णवाहिका गावासाठी उपलब्ध करून दिली होती. स्वतःची रुग्णवाहिका असणारी देवबाग ही जिल्ह्यातील बहुदा पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. गावातील तरुणांसह ग्रामस्थांचा शारीरिक फिटनेस उत्तम राहावा यासाठी देवबाग ग्रामपंचायतीने ओपन जिम देखील उभारले आहे. या पार्श्वभूमीवर आता देवबाग ग्रामपंचायतीने रुग्णवाहिकेनंतर डेड बॉडी फ्रीझर उपलब्ध करून दिला आहे.
एखादी व्यक्ती मयत झाल्यावर त्याचे नातेवाईक बाहेर गावातून अंतिम दर्शनासाठी येत असतात. अशावेळी पार्थिव एक ते दोन दिवस ठेवावे लागते. देवबागमध्ये यासाठी मालवण मधून डेड बॉडी फ्रीझर किंवा बर्फ आणावा लागतो. त्यासाठी किमान ३ ते ४ हजार रुपये खर्च होतात. गावातील ही गरज लक्षात घेऊन देवबाग ग्रामपंचायतीने पार्थिव ठेवण्यासाठी डेड बॉडी फ्रीझर मोफत उपलब्ध करून दिला आहे. अशी सुविधा उपलब्ध करून देणारी देवबाग ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. या सुविधेबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



