सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक कोरोना बाधित आल्याने जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा व नागरिक हादरले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी १५ जुलै रोजी गणेशोत्सव नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीला नाईक हजर होते. या बैठकीला स्वतः पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्याची बहुसंख्य प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती. परिणामी मंत्री सामंत यांच्यासह अन्य उपस्थित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर क्वारंटाइनची टांगती तलवार आली आहे.
दरम्यान, अद्याप संपर्कातील सबंधित क्वारंटाइन झाल्याची अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.आमदार वैभव नाईक कोरोना बाधित झाल्याची ही वार्ता नागरिकांत पोहोचताच पूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली. आ नाईक हे कोरोना बाधित असल्याचे २० जुलै रोजी रात्री उशिरा स्पष्ट झाले.नाईक यांचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वावर होता. विशेषता कुडाळ आणि मालवण तालुक्यात ते शहरापासून गावोगावी फिरत होते. तसेच अलीकडे पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यात सुद्धा ते होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील ना सामंत यांनी १५ जुलै रोजी घेतलेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीला सुद्धा आ नाईक उपस्थित होते. त्यामुळे याचा फटका जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह प्रमुख प्रशासकीय आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना बसणार आहे. त्यामुळेच आ नाईक हे कोरोना बाधित झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.