दोडामार्ग (प्रतिनिधी): कोकणचा मेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजूचा हंगाम यंदा काहीसा लवकर सुरू झाला आहे. दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी बाजारपेठेत नवीन काजूची आवक सुरू झाली असून, सध्या व्यापाऱ्यांकडून १६० रुपये प्रति किलो दराने काजू खरेदी केला जात आहे.
यंदा काजू पिकासाठी हवामान पोषक राहिल्याने झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर आणि फळधारणा झाली आहे. त्यामुळे बागांमधून आता कच्चा काजू विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. गोवा, कर्नाटक, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथील अनेक मोठे कारखानदार दोडामार्ग तालुक्यातून दरवर्षी शेकडो टन काजूची खरेदी करतात. सुरुवातीचा दर १६० रुपये असला, तरी पुढील काळात आवक वाढल्यानंतर दरात काही प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
मागील वर्षाच्या (२०२५) हंगामाचा विचार केला असता, सुरुवातीला काजूला १४० ते १५० रुपयांच्या आसपास दर मिळाला होता. मात्र, हंगामाच्या मध्यात अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने काजूच्या गुणवत्तेवर परिणाम झाला होता, ज्यामुळे दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. गेल्या वर्षी हंगामाच्या उत्तरार्धात दर १२० रुपयांपर्यंत खाली आले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.
शेतकऱ्यांची २०० रुपयांची मागणी कायम
काजूचा उत्पादन खर्च, खते, औषध फवारणी आणि मजुरीचा वाढता दर पाहता काजूला किमान २०० रुपये दर मिळावा, अशी मागणी बागायतदार अनेक वर्षांपासून सरकारकडे करत आहेत. मात्र, अद्याप शासनाकडून हमीभावाबाबत ठोस निर्णय झालेला नाही. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला दर मिळाल्यास गेल्या वर्षी झालेली तूट भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.



