सांगली – ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे पुरात अडकलेल्या ३२ नागरिकांना बाहेर काढत असताना नाव पलटी झाली असून नावेतील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह सापडले असून इतर १६ जणांचा शोध सुरु आहे. ब्रह्मनाळ येथे कृष्णा आणि येरळा नदीचा संगम होतो. सध्या कृष्णानदीला महापूर आला असून ब्रह्मनाळ येथे नदीचे पात्र अक्राळविक्राळ बनले आहे. संपूर्ण ब्रह्मनाळ गावाला महापुराच्या पाण्याने वेढा दिला असून, गावात तीन दिवसांपासून पाणी आहे.
गावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या नावेतून नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात येत होते. नावेत क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ३२ जण बसले होते. नाव कडेकडेने गावाबाहेर जात असताना नावेचा पंखा पाण्यातील झाडात आणि पाईपमध्ये अडकला. नावेतील वाढलेले वजन आणि पंखा अडकल्याने नाव उलटली. पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने नावेतील कोणालाच काहीही करता आले नाही. पोहता येणारे दोघे जण पाण्यात झाडाझुडपांना धरून राहिले. मात्र इतरजण बुडाले. बत्तीसपैकी १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी काही पाण्याबरोबर वाहून जाऊन कडेला अडकले होते.
(सौजन्य : www.sahajshikshan.com)