सिंधुदुर्ग – राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना अपक्षाला पाठींबा देणार नाही मात्र संभाजी राजे शिवसेनेत आल्यास दुसर्या जागेसाठी त्यांना शिवसेनेची उमेदवार मिळेल अशी माहीती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात बोलताना दिली आहे.
तसेच शरद पवार यांनी संभाजी राजेंना पाठींबा दिलेला नाही तर ही सहावी जागा शिवसेनेचीचं असल्याच स्पष्ट केल आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख जो उमेदवार देतील तो खासदार होईल. राष्ट्रवादीने कोणत्याही परिस्थितीत आमच्या माहीती प्रमाणे संभाजी राजेंना एकतर्फी पाठींबा दिला नसल्याचेही विनायक राऊत म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजप दोन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. महाविकास आघाडी घटक पक्षांकडे २६ अतिरिक्त मते असून आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणण्याकरता १६ मतांची आवश्यकता असणार आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीचे हे गणित जमू शकते. म्हणून शिवसेनेने दुसरा उमेदवार उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जर संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर संभाजी राजे यांना उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने दर्शवली आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसही पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती. पण शिवसेनेने दोन जागेवर उमेदवार उतरवण्याची तयारी केली असल्यामुळे महाविकास आघाडीकडून पाठिंबा मिळणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे, संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना खुले पत्र लिहिले आहे. सहाव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे मदतीचे आवाहन संभाजीराजे यांनी या पत्रात केले आहे.