कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठीच वाहतूक सुरु आहे. मात्र असं असतानाही रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमान्यांची बोटीतून वाहतूक होत असल्याचा प्रकार घडला आहे. या ठिकाणी सीमा बंद असतानाही समुद्रमार्गे मुंबईतून चाकरमान्यांची वाहतूक करण्यात आली. या प्रकरणी वाहतूक करणाऱ्या बोट मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.
पुढील काही दिवस कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळेच सरकारने या काळात नागरिकांनी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, असं असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक आरोग्याला बाधा होईल, अशा कृती केल्या जात आहेत. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण देखील वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घेत बोट मालकांवर गुन्हा दाखल केला. आता आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघन, मेरीटाईम बोर्ड कायदा उल्लंघन, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेला कायदा उल्लंघन या कलमांतर्गत गुहागर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोटचालकावर अधिकचे पैसे घेऊन प्रवाशांची वाहतूक केल्याचाही आरोप आहे.